१७ डिसेंबर २२, मुंबई
धनंजय देशमुख
मुंबई - हवा बदलत आहे..
गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून मुंबई मध्ये दिल्लीच्या हवेचा फील यायला लागलाय. येथील हवेतील आर्द्रता (humidity) ऑक्टोबर ते डिसेंबर मध्ये कमी होतेच, त्यामुळे हवा हल्की गरम किंवा थंड होते, मात्र या वर्षी हवेची गुणवत्ता खालावली आहे. एयर क्वालिटी इंडेक्स, म्हणजे हवेचा गुणवत्ता निर्देशांक कमालीचा वाढला आहे. काही दिवसांपुर्वी तो धोकादायक पातळीवर गेला होता. सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्चनुसार, मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक ९ डिसेंबरला दिल्लीपेक्षा (262) बराच जास्त 308 होता. या हिवाळ्यात मुंबईशहराचा AQI देशाच्या राजधानीपेक्षा जास्त होण्याची ही दुसरी वेळ आहे.
आजघडीला मुंबईतील सध्याचे PM2.5 एकाग्रता WHO द्वारे 24 तास हवा गुणवत्ता मार्गदर्शक तत्त्वे दिलेल्या शिफारस केलेल्या मर्यादेपेक्षा 4.3 पट जास्त आहे. AQI (Air quality index) म्हणजेच हवा गुणवत्ता निर्देशांक हा हवेतील कार्सिनोजेनिक पार्टिक्युलेट मॅटर (PM 2.5) च्या एकाग्रतेवर आधारित असतो. 50 पेक्षा कमी PM2.5 साठी AQI पातळी असलेली हवा 'चांगली', 50-99 'समाधानकारक', 100-199 'मध्यम', 200 वरील 'खराब', 300 च्या वर 'अतिशय गरीब', आणि 400 पेक्षा जास्त 'गंभीर' मानली जाते.
या दिवसांत मुंबईतील हवा कोरडी असतेच मात्र वाढत्या प्रदूषणामुळे (वाहन आणि बांधकाम) तिची गुणवत्ता खराब होतेय. भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM) पुणे अंतर्गत सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च (SAFAR) ने अलीकडेच केलेल्या PM2.5 प्रदूषकांसाठी 2019-20 स्त्रोत अंदाज विश्लेषणातून दिसून आले की वाहतूक क्षेत्रामुळे PM2.5 उत्सर्जनाचा वाटा 2019-20 मध्ये 30.5% होता, 2016-17 मध्ये हा जवळपास निम्मा म्हणजे 16% होते. प्रशासनाने यावर काही उपाययोजना केली होती ती किती पुरेशी ठरते हे लवकरच कळेल. असो.
हवा राजकारणाची..
राज्यातील राजकारण या ना त्या कारणाने तापतेय, किंबहुना तापवले जातेय. हवा दूषित होतेय. अर्थात त्यामागे येणार्या काळातील घटना लक्षात घ्याव्या लागतील.
मुंबईसह राज्यातील अकरा महानगर पालकांची निवडणूक प्रलंबित आहे. पुढच्या फेब्रुवारी मध्ये मुंबई महानगरपालिका प्रशासकीय अधिकारीच्या अखत्यारीत जायला एक वर्ष होईल. त्या अनुषंगाने राजकीय परिस्थिती गढूळ होतेय. एकीकडे भाजप च्या राज्यातील नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांनी आधीच घोषित केले आहे की, भाजप येणार्या निवडणुका बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदेगटाला सोबत घेऊन लढेल. मात्र त्यांच्या विरोधकांचे अजून ठरलेले दिसत नाहिये. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजेच ठाकरे गट मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढते की कॉन्ग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस ला सोबत घेऊन हे अजूनही गुलदस्त्यातच आहे.
हे तिन्ही पक्ष एकत्र लढण्याची शक्यता कमी आहे, व्यावहारिक पातळीवर सुद्धा ते कितपत जमेल हे बघावे लागेल, कारण कॉन्ग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यापैकी कुणाला तरी शंभर पेक्षा बर्याच कमी जागांवर समाधान मानावे लागेल (२२७). ही तडजोड होईल असे वाटत नाही. त्याच अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांनी वंचित आघाडीला जवळीक साधायचा प्रयत्न केलाय का असा प्रश्न उपस्थित होतो. मागच्या वर्षी वंचित आघाडीने तेजस्वी यादव यांच्या राजद आणि केरळ मधील कट्टरपंथिय IUML यांना सोबत घेतले होते. काही आठवड्यांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी राजदच्या तेजस्वी यादव यांची भेट घेतली होती. जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, वंचित आघाडी सोबत गेली तर त्यांचे जागावाटपाचे बरेचसे प्रश्न सुटतील, मात्र त्यांचा पारंपारिक मतदार (मराठी) किती साथ देईल यावर साशंकता वाटते.
दुसरीकडे, भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना सोबत लढणार अशी घोषणा जरी झाली असली त्याचे सगळे कंगोरे तयार झाले असे वाटत नाही. पूर्वाश्रमीच्या शिवसेनेच्या आमदार, आणि खासदारांनी त्यांना सोयीस्कर असलेले गट निवडले, मात्र मुंबईच्या नगरसेवकांनी अजूनही "जैसे थे" मार्ग अवलंबला आहे. निवडणुका घोषित झाल्यावर तिकडे हालचाली होतील असे दिसतेय. त्यामुळे त्याचा थोडा परिणाम भाजपच्या इच्छुकांवर होऊ शकतो, कारण २०१९ मधील दगाफटक्यानंतर पुढील निवडणुका स्वबळावरच होतील या आशेने गेल्या दोन वर्षांत अनेकांनी तयारी केली.
या सगळ्या धांदलीत मनसे पण पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरेल असे दिसतेय. सध्यातरी त्यांनी मध्यममार्ग घेतलेला दिसतोय, मात्र तो भाजपला जास्त पूरक असा वाटतो. अर्थात ह्याचा अर्थ भाजप आणि मनसे युती होईल असे नाही, किंवा ती व्हावी हेही नाही. पण एकमेकाला पूरक अश्या भूमिका घेऊन मुंबईचे आणि राज्याचे राजकारण साधले जाईल असे वाटते.(वाचा एक अधिक शून्यएक अधिक शून्य)
आजघडीला बाळासाहेबांची शिवसेनेला (शिंदे गट) मुंबई पेक्षा ठाणे आणि राज्यात, तर मनसेला मुंबईत जास्त स्वारस्य आहे आढळते. तेव्हा भाजप यातून कसा सुवर्णमध्य साधते हे बघणे महत्वाचे. अर्थात गुजरात मध्ये मिळालेल्या शक्तिशाली बहुमताने पक्षातील अनेक इच्छुकांची आशा बळावली असेल.
नागपुरात अवकाळी..
सालाबादाप्रमाणे यावर्षीही नागपुरात अवकाळी पाऊस बरसला. पुढचा आठवड्यापासून शहरात राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. तेव्हा उन, थंडी, पाऊस यांच्या खेळात राजकिय ऊर्जा वाढते की कमी होतेय याची उत्सुकता. या अधिवेशनात राज्याच्या अर्थव्यवस्थेवर (महाराष्ट्रापुढील आव्हाने आणि संधी) आणि राज्यातील संवेदनशील शहरांवर (उदाहरणार्थ अमरावती बनतेय का राजकीय प्रयोगशाळा?) वर चर्चा होईल अशी आशा करायला हरकत नाही
मुंबईच्या मानसून मधील वेगवान हवेमुळे राज्यात सत्तांतर घडले, शिंदे-फडणवीस सरकारला आता पाच महिने झाले. राजकिय स्थैर्य प्राप्त होतेय असे वाटत असताना "मित्रा' (Maharashtra Institute for Transformation) वरून काही अबोला होतो का अशी परिस्थिती निर्माण झाली होती. गेल्या आठवड्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्यातील आणि देशातील सर्वात मोठ्या अत्याधुनिक द्रुतगती मार्ग म्हणुन नावाजलेल्या समृद्धी महामार्गाचे लोकार्पण केले. उद्योग जगताकडून गेल्या काही आठवड्यात राज्यात एक लाख कोटी पेक्षा अधिकच्या गुंतवणुकीची घोषणा झाली आहे, जे अत्यंत उत्साहवर्धक आहे. विशेष म्हणजे ही गुंतवणुक सध्या असलेले उद्योग करीत आहेत, म्हणजे जे नवीन येणारे उद्योग आहे ते बोनस ठरतील. त्यामुळे सगळीकडे आल बेल आहे असे मानायला हरकत नाही.
मात्र राजकीय हवा कधीही आणि कशीही बदलू शकते! १९९१ च्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये मोठी उलथापालथ घडली होती!! मार्च २०२० मध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांच्या सारख्या कॉंग्रेसच्या मोठ्या नेत्याने भाजपामध्ये प्रवेश केला. जून २०२२ मध्ये राज्यात, मध्यप्रदेशच्या धर्तीवर ऑपरेशन लोटस झाले, आता त्याचा दुसरा अंक घडतो का?, आणि तसे घडले तर त्यात कोण महत्वाची भूमिका बजावतो हे येणार्या काही दिवसांत दिसेल!
जाता जाता..
गेल्या तीन वर्षांत नागपूर मध्ये आमूलाग्र बदल घडलेला दिसतो, त्याचे श्रेय राज्य, केंद्र सरकारला जात असले तरीही, राज्यातील दोन मुख्य राजकिय आधारस्तंभ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सर्जनशीलतेला, आणि त्यांच्या ध्यासपूर्वक भूमिकेला तेवढेच महत्त्व राहते.
देशातील राजकारण स्थिर असले तरीही हवा कशी दूषित होईल यासाठी पुरेपूर प्रयत्न सुरू आहेत. दिल्ली महानगरपालिका मध्ये पंधरा वर्षांनंतर बदल घडला, अनेक राजकीय पंडित त्याला अँटी-इन्कमबंसी (म्हणजे मतदाता मध्ये नाराजी) म्हणतात, मात्र गुजरात मध्ये सत्तावीस वर्ष पक्षाची सत्ता असूनही पक्षाच्या जागा वाढल्या (सलग सातव्यांदा बहुमत)! दिल्लीच्या निकालांचे भौगोलिक दृष्ट्या अवलोकन केले तर असे आढळेल की शहरात ज्या भागात फेब्रुवारी २०२० मध्ये सांप्रदायिक दंगल झाली होती, त्या भागात (उत्तर पूर्व दिल्ली), आणि त्या शेजारील पूर्व दिल्ली आणि चांदणी चौक लोकसभा क्षेत्रात भाजपची कामगिरी उंचावली, मात्र केंद्रीय मंत्री असलेल्या भागात कमालीची खालावली!! इथे "आप"चा 'फुकट पाणी, व विजेचा आलाप चालला नाही! ह्याचा अर्थ एकाच शहरातील मतदारांच्या प्राथमिकता कमालीच्या बदलू शकतात.
येणार्या महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील, आणि विशेषत मुंबईतील अभ्यासू राजकारणी मंडळी ह्याकडे कदाचित लक्ष देतील. राज्यात मध्यावधी निवडणुका होतील अशी परिस्थिती आजघडीला नाही पण नागपूर मधील दोन (तीन?) आठवडे महत्वाचे ठरू शकतात. कदाचित राज्य आणि महानगरपालिका निवडणुका सोबत होतील?
शहराची हवा खराब झाली की त्याचे दुष्परिणाम काय होतात हे दिल्ली मधील परिस्थिती बघून कळेल. मुंबईत पावसाळा तसाही आव्हानात्मक असतो, त्यात आता हिवाळ्यात शहरातील हवेची गुणवत्ता खालावत गेली तर मात्र कठीण होईल. नागरिकांची जबाबदारी आहे की वैयक्तिक वाहनांचा वापर कमी कसा होईल याचा प्रयत्न होईल, आणि प्रशासनाची जबाबदारी ही की भरमसाठ होणारी बांधकामे, एका रचनात्मक दृष्टीने कसे होईल, आणि ते होताना धूळ हवेत ना जाण्यासाठी असलेले नियम कडकपणे पाळले जातील ह्याची खबरदारी घेणे.
मुंबईकरांनो धुळीपासून बचावण्यासाठी मास्क वापरा, श्वसनाचे आजार टाळा.
तूर्त इतकेच.
धनंजय देशमुख, मुंबई
(लेखक, स्वतंत्र मार्केट रिसर्च विश्लेषक (नवीन गुंतवणूक आणि यशस्वी रणनीती (स्ट्रॅटेजि) आखण्यासाठी सल्लागार सेवा) आहे. पोस्टमधील माहिती, आकडेवारी, कविता, फोटो इंटरनेट वरुन साभार घेतले आहे.)).
धनंजय देशमुख
"सीने में जलन आँखों में तूफान सा क्यों है
इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है"
(लेखक, स्वतंत्र मार्केट रिसर्च विश्लेषक (नवीन गुंतवणूक आणि यशस्वी रणनीती (स्ट्रॅटेजि) आखण्यासाठी सल्लागार सेवा) आहे. पोस्टमधील माहिती, आकडेवारी, कविता, फोटो इंटरनेट वरुन साभार घेतले आहे.)).
खूप सुंदर शब्दांकन केलेत सर
ReplyDeleteधन्यवाद
Delete