२० नोव्हेंबर २०२२
अमरावती बनतेय का राजकीय प्रयोगशाळा?
- धनंजय देशमुख, मुंबई
अमरावती बनतेय का राजकीय प्रयोगशाळा?
- धनंजय देशमुख, मुंबई
अमरावती (प्राचीन इन्द्रपुरी) जवळपास सात-आठ लाख लोकसंख्या असलेले पश्चिम विदर्भातील एक मोठे शहर. मागच्या आठवड्यात अमरावती आणि बडनेरा येथे चार वर्षांच्या कालावधी नंतर जाणे झाले. ह्या खेपेला फारसे फिरणे झाले नसले तरीही काही बदल नजरेत बसले. नागपूरहून अमरावतीला येतांना रहाटगांव नाक्यावर आता कपड्यांची भरपूर मोठमोठी दुकाने /मॉल झाली आहेत, ज्यामुळे बरीच लोक इकडे खरेदीसाठी येतात. हे मार्केट पूर्णपणे नव्या पद्धतीने वसवलेले आहे असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. कदाचित शहरातील मूळ कपड़ा मार्केट कधी काळी (50-70 वर्षांपूर्वी) असेल वसवलेले असेल.
त्याचप्रमाणे या भागात अनेक मोठी मंगल कार्यालये उभी राहिली आहेत. कपड़ा मार्केट आणि मंगल कार्यालय झाल्याने हा भाग आता शहरातील वाटतो, कारण वर्दळ वाढलेली आहे.
दूसरी लक्षणीय बाब म्हणजे शहरातील सिमेंटचे रस्ते - गाडगेनगर ते बडनेरा येथपर्यंत. त्यामुळे वाहतुकीला गती प्राप्त झालेली दिसते. शहरातील शिक्षण संस्था प्रगत असल्याने अनेक व्यक्ति परदेशी किंवा पुणे, मुंबई सारख्या मोठ्या शहरात चांगल्या प्रकारे स्थायिक झालेली आहे. त्यामुळे बदलत्या काळानुसार शहरातील राहणीमान प्रगत झालेले आहे, दुचाकीच्या बरोबरीने नवनवीन चार-चाकी वाहने सुद्धा रस्त्यावर आढळतात. मुख्य म्हणजे अमरावती मधील एका तरुणाने झेपकॅब नावाची उबेर सारखी अद्ययावत ॲपबेस्ड टॅक्सी सर्विस सुरू केलेली आहे!
तिसरी बाब म्हणजे, अमरावती-बडनेरा मार्गावर, एक छोटा पट्टा सोडला तर दोन्ही बाजूने वस्ती झालेली आहे (बेनाम चौक आहे!), विशेषतः बडनेरामधील जुन्या वस्तीकडे जाणार्या रस्त्यावर!
बडनेरा येथे रेल्वे स्टेशनवर नवीन बांधकाम झालेले आहे, काही खुणा आहे तश्याच आहेत (उदाहरणार्थ पुस्तकांचे दुकान), मात्र महत्वाचे म्हणजे आता जवळपास पन्नास एक्स्प्रेस गाड्या रोज येथे येतात आणि जातात! मागच्या दशकातील ही ठळक बाब म्हणावी लागेल. अमरावती स्थानकात येणार्या रेल्वे गाड्यांची संख्या सुद्धा वाढतेय.
हा झाला पायाभूत सुविधांमधील बदल. मात्र गेल्या तीन वर्षांपासून अमरावती-बडनेरा ज्या कारणामुळे माध्यमात चर्चेला आहे, ते अनेकांना अचंबित करणारा आहे. सांप्रदायिक कट्टरवाद, त्यातून निर्माण होणारी तणावाची परिस्थिती आणि शेवटी त्याचे परिमार्जन सांप्रदायिक दंगलीत हा प्रकार या भागात सर्रास घडायला लागला आहे किंवा भीती असते. उमेश कोल्हे यांची नृशंस हत्या, गेल्या काही महिन्यात एका समाजातील मुली आणि महिलांविरुद्ध होणार्या धर्मांतरण आणि त्यातून होणारा छळ यांच्या घटनांमुळे अमरावती हे शहर राजकिय रडारावर पुन्हा नव्याने आले आढळते. अनेकांना हे नवीन असेल, पण सत्य परिस्थिती काय आहे?
भूतकाळातील कानोसा
अमरावती शहर हे जिल्ह्याचे स्थान आहे. शासकीय विभाग, रेल्वे, शैक्षणिक संस्थेत काम करणारा एक मोठा वर्ग, सोबतीला शेतकरी समाज, त्याला पूरक म्हणुन तयार झालेला व्यापारी वर्ग, विशेष करून कापड व्यवसायांत. अमरावतीचे अजून काही वैशिष्ट्ये आहेत जे आजच्या पिढीला माहिती नसेल - एकेकाळी (म्हणजे 1995/99 पर्यंत) एकट्या अमरावती शहरात अकरा सिनेमागृहे होती. विशेष म्हणजे, सगळे सिनेमे अमरावतीला एक दिवस आधी, म्हणजे गुरुवारी रिलीज व्हायचे (इतर ठिकाणी शुक्रवारी), त्याचे कारण म्हणजे इथे असलेले फिल्म-"डिस्ट्रीब्यूटरांचे जाळे.
दूसरे वैशिष्टय़ (?) म्हणजे इथे असलेले कारागृह. एकेकाळी या कारागृहात मुंबई किंवा देशातील नामचीन गुंड, आरोपी कैदेत असायचे. बडनेरा जंक्शन मूळ रेल्वेमार्गावर असल्याने कैद्यांच्या सहकार्यांना किंवा नातेवाइकांना येणे जाणे सोयीस्कर होते (12-15 तास प्रवास). त्यामुळे शहरात बाहेरच्या लोकांचा वावर होता, अगदी ऐंशीच्या दशकापासून. कदाचित त्यातील काहींना कायद्याच्या पळवाटा माहिती असाव्यात किंवा फारशी भीती नसावी (एकेकाळी पोलीस अधिकारी चित्तलवार यांचा मात्र वचक होता).
स्थलांतर करणार्या या विशिष्ट वर्गाच्या लोकांची इथल्या काही स्थानिक लोकांसोबत ओळख आणि पुढे व्यावसायिक संबंध नसतील झाले तर आश्चर्य. डीएचएफएल घोटाळाप्रकरणी अमरावतीतील एका व्यक्तीला काही महिन्यापुर्वी सीबीआय ने मुंबई मध्ये चौकशी साठी पाचारण केले होते (ऐंशीच्या दशकात, ह्याच व्यक्तीला अत्यंत कमी वयात असताना नार्कोटिक्स मधील एका मोठ्या प्रकरणात चौकशीसाठी बोलाविले होते).
१९८६ च्या दिवाळीत शहरात मोठी सांप्रदायिक दंगल घडली होती - कारण होते एका काश्मिरी दहशतवाद्याला देण्यात आलेली फाशी!
जानेवारी २०२१ च्या शेवटी कोरोनाची दूसरी लाट भारतात ज्या एक-दोन शहरांपासून सुरू झाली त्यात अमरावती सुद्धा होते.
तेव्हा, अमरावती शहर हे शांत होते आणि आता ते अशांत होतेय हे म्हणणे योग्य ठरणार नाही. साधारणपणे ह्याच काळानंतर शहरातील शांततेने कूस बदलली. त्या काळात होणाऱ्या क्रिकेट मॅच मध्ये भारताचा पाकिस्तान विरुद्ध पराभव म्हणजे काही भागात तणाव.
राजकीय आरसा..
अमरावती हा कॉंग्रेसचा पारम्परिक बालेकिल्ला राहिलेला आहे. देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपति श्रीमती प्रतिभाताई पाटील या अमरावतीच्या. शहरात आणि बडनेरा मध्ये कॉन्ग्रेस चा वावर जास्त होता - ह्याला तडा गेला नव्वदीच्या सुरुवातीला, शिवसेना भाजपला बर्यापैकी यश मिळाले. २००८-९ मध्ये राणा दाम्पत्याचे स्थानिक राजकीय पटलावर आगमन झाले आणि त्यानंतर इथले राजकिय चित्र बदलले. इथली लढाई मुख्यत्वे त्रिकोणी राहते - भाजप, शिवसेना , कॉन्ग्रेस / राष्ट्रवादी आणि भारिप किंवा तत्सम विचारसरणी असलेले.
अमरावतीला लागून असलेल्या मुख्य विधानसभा म्हणजे अमरावती शहर, तीवसा, आणि बडनेरा. ह्यातील बडनेरा विधानसभेची रचना काहीशी विचित्र वाटू शकते - शहरातील काही भाग बडनेरा मध्ये जातो.
मुळात कॉंग्रेसचा बालेकिल्ला आणि त्यात जातीय आणि साम्प्रदायिक ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात असल्याने येथे निवडून येणे तितकेसे सोपे नाही. त्यात अमरावती जिल्ह्य़ातील पक्षीय नेतृत्व पाहिजे तेवढे ताकदवान (खंबीर आणि खमके) आढळत नाही. तेव्हा ही लढाई अधिक कठीण होते, विशेषतः भाजपसाठी.
प्रयोगशाळा?
गेल्या दोन-अडीच वर्षात शहरात /जिल्ह्यात झालेल्या घटनांचे नीट आकलन केले तर असे वाटते की अमरावती-बडनेराला आता काहींच्या साम्प्रदायिक राजकीय प्रयोगशाळेचे स्वरुप आले की काय? असे वाटण्याचे कारण म्हणजे -
टुकडे-टुकडे गैंग च्या उमर खालिदचे फेब्रुवारी २०२० मध्ये चिथावणीखोर भाषण, आणि योगायोगाने त्यानंतर दिल्ली येथे घडलेली भीषण सांप्रदायिक दंगल.
कॉँग्रेसच्या मुंबईतील एका बड्या नेत्याला एका समाजाचा असलेला पाठिंबा,
समाजवादी पक्षाच्या नेत्यांचे येणे जाणे आणि त्यांची वक्तव्ये.
भाजपची राजकीय खेळी..
राज्यात ह्यावर्षी जून मध्ये झालेल्या विधानपरिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपकडून अमरावती जिल्ह्य़ातील दोन उमेदवार होते, दोघेही जिंकले.पश्चिम विदर्भात अमरावती भाजपसाठी अत्यंत महत्वपूर्ण भूमिका निभावू शकतो. सध्या तिथली राजकिय परिस्थिती पक्षाला पाहिजे तेवढी सशक्त आढळत नाही. त्यामुळे एक खासदार आणि एक आमदार यांचे नियोजन शहरातील पक्ष संघटनेत जान फुंकू शकेल. अर्थात हे काही एका रात्री होणार नाही पण पुढल्या दोन वर्षात बरेच फरक आढळू शकतात - विशेष करून दोन्हीही उमेदवार बर्यापैकी तडफदार आहेत, आणि राज्यातील नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले मानले जातात. आधीच अमरावतीला भाजपचे एक विद्यमान विधान परिषद आमदार होते, त्यांना आता बळच मिळेल.
मात्र भाजपसाठी अमरावती का महत्वाची ठरते हे बघणे महत्वाचे आहे. तिथे काही मोठे उद्योग येणार आहेत का? की राजकिय किंवा साम्प्रदायिक दृष्टीने?
तिसरीकडे, भाजपचे दोन मोठे नेते लोकप्रतिनिधी झाल्यावर, तिथल्या स्थानिक राजकारणावर काय परिणाम होईल?
अमरावतीचे एक अपक्ष आमदार, एक अपक्ष खासदार आणि कॉन्ग्रेस आमदार मंत्री अनेकदा चर्चेत राहिलेत. येणार्या काळात त्यांना अमरावतीचे राजकारण जड जाईल की सोपे होऊन ते पुढच्या काळात भाजपला अनुकूल होतील?
लक्षवेधी आणि भावनिक.
पूर्व मुख्यमंत्री आणि विद्यमान उप मुख्यमंत्री श्री देवेन्द्र फडणवीस हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. राज्यकर्ते म्हणुन, आणि गेल्या काळातील साम्प्रदायिक घटनांमुळे त्यांचे या जिल्ह्याकडे विशेष लक्ष असेलच, मात्र महत्वाचे म्हणजे अमरावती हे त्यांचे आजोळ सुद्धा आहे, तेव्हा या शहरासोबत त्यांचे एक भावनिक नाते असावे ज्याला कदाचित खालील ओळी व्यक्त करतील -
"कुछ पक्के कुछ कच्चे से
वो मकान वो गलियारे
जब हर साल छुट्टियां बिताने
जाते थे हम ननिहाल के चौबारे.."
अमरावती शहर हे फक्त श्री अंबादेवी आणि रुक्मिणी मंदिर, सांबारवडी, शिक्षण आणि कपाशीसाठी प्रसिद्ध आहे (सिनेमागृहे कमी झाली आता) असे नाही. येथील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे भारतीय क्रिडा आणि क्रिडाशिक्षण क्षेत्रात विशेष स्थान आहे. अमरावती शहराला संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज, संत श्री गाडगेमहाराज, राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचे आशीर्वाद लाभले आहे. ज्येष्ठ कवी आणि गझलकार सुरेश भट, भारतीय संगणक कार्यक्रमाचे आधारस्तंभ पद्मभूषण डॉ विजय भटकर यांचे वास्तव्य लाभले आहे.
शहरापासून जवळच असलेले सुर्जी अंजनगाव हे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेले प्राचीन स्थळ आहे. येथे १७४५ मध्ये स्थापित झालेले श्री देवनाथ पीठाचे मठ आहे. आसेच्या आणि अरगावच्या लढाईनंतर ३० डिसेंबर १८०३ रोजी अंजनगाव येथे इंग्रज आणि मराठा लोकांचे प्रमुख दौलतराव सिंधिया यांच्यात सुर्जी-अंजनगावचा तह झाला असल्याची नोंद आहे. या तालुक्याने अनेक आक्रमणे परतवलेली, अनेक संघर्ष अनुभवलेली आहेत.
आजघडीला अमरावती हे एकदम अशांत नसले तरीही गेल्या काही वर्षांत तिथली शांतता नक्किच भंग पावलेली आहे. परिस्थिती पराकोटीला जायच्या आधी स्थानिक नेतृत्वाने राजकारणाच्या पलीकडे जाऊन राज्यातील आणि केंद्रातील नेतृत्वाला सखोलपणे माहिती देणे आवश्यक आहे. अमरावती येथील राजकारण काही ठरावीक परिवारांवर विसंबून राहणार नाही याचा विचार राज्य भाजपाने केलेला असेल.
विदर्भातील नागपूर येथे होणार्या आगामी हिवाळी अधिवेशनात जिल्ह्यातील राजकिय आणि सांप्रदायिक तणावाबद्दल विस्तृत चर्चा घडवून आणणे आवश्यक आहे. त्याऊपर विद्यमान महायुती सरकारने (केंद्रीय संस्था आणि केंद्र सरकारच्या मदतीने) संवेदनशील पद्धतीने पुढच्या काळासाठी ठोस आणि शाश्वत उपाययोजना करणे आवश्यक आहे (उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश मध्ये होते तशी).
श्री एकनाथ शिंदे आणि श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील विद्यमान राज्यसरकार ह्याकडे गांभीर्याने लक्ष केंद्रित करेल ही अपेक्षा.
कालाय तस्मै नमः
- धनंजय देशमुख, मुंबई
स्तंभलेखक एक स्वतंत्र मार्केट रिसर्च विश्लेषक आहे.
Comments
Post a Comment