१६ एप्रिल २०२१, मुंबई
विठ्ठलाच्या दारी मतदाराला हाक...
उद्या ,१७ एप्रिल ला पंढरपुर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूकीसाठी मतदान होणार आहे. 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून श्री भारत भालके यांनी बाजी मारली होती. परन्तु मागच्या वर्षी त्यांचे निधन झाले, त्यामुळे आता पोटनिवडणुक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ने भालके यांच्या सुपुत्र श्री भगीरथ भालके उमेदवारी दिली आहे, तर भाजपकडून उद्योजक / व्यावसायिक श्री समाधान आवताडे यांना मैदानात उतरले आहेत.
काय आहे परिस्थिती?
आघाडी सरकारच्या मागच्या अठरा महिन्यांच्या कामगिरीची दखल घेतली तर मतदानाचा कौल त्यांच्या विरुद्ध दिशेने जाऊ शकतो. शेतकर्यांची कर्जमाफी, कोरोना महामारी ची परिस्थिती सक्षमपणे हाताळण्यात आलेले अपयश, राज्यातील कायदा सुव्यवस्था, भ्रष्टाचार, आणि मुळात तीन पक्षात असलेले मतभेद, असे अनेक मुद्दे आहेत ज्यावर येथील मतदाता आघाडी उमेदवाराच्या विरुद्ध बाजूने मतदान करू शकतो.
परन्तु, विषय भावनिक आहे. पुढच्या तीन वर्षांसाठी गादी त्यांच्याच कुटुंबाला चालवायला मिळायला हवी असा एक सूर असू शकतो. दुसरे, नाही म्हंटले तरी तीन पक्षाचे संख्याबळ एका पक्षावर भारी पडू शकते, ते जर त्या संख्येने कार्यरत झाले तर!
भाजपच्या बाजूने विचार केला तर, आवताडे यांचे प्रतिस्पर्धी श्री प्रशांत परिचारक यावेळी त्यांच्या सोबत आहेत. सोबतीला भाजपचे नेतृत्व, पक्षाची प्रचारयंत्रणा पुर्णपणे कार्यरत आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होईल यात शंका नाही. पण कोण सरशी मारेल?
कसा आहे मतदाता?
पश्चिम महाराष्ट्रातील मतदाता हा राजकिय दृष्ट्या बर्यापैकी प्रगल्भ आहे. साखर उद्योग, आणि सहकार चळवळ या भागात मोठ्या प्रमाणावर आहेत, याचा परिणाम असा की सामान्य मतदारला - पक्ष, गट, कार्यकर्ता, नेते, निवडणूक, राजकारण या बाबी त्याला नव्या नसतात. अश्या मतदारसंघात अनेक नेते मंडळी निर्माण होतात , त्यांचे कुटुंब कबिले असतात आसपासच्या नेत्यांचा सुद्धा वावर असतो, त्यातून अनेक निष्ठावंत तयार होतात. अश्या परिस्थितीत अनेकांच्या निष्ठा जाणून घेणे आणि ते राखण्यात यशस्वी होतो त्यांनाच विजयश्री प्राप्त होते (knowing personalities, managing loyalties, and tapping fault-lines becomes key).
मागचा इतिहास..
गेल्या पंढरपुर मंगळवेढा विधानसभा क्षेत्राची निवडणूक परिचारक आणि भालके कुटुंबीयांच्या अवतीभवती होते. 1985 ते 2004, म्हणजे सलग पाच वेळा परिचारक कुटुंबिय जिंकले, तर 2009 पासून भालके कुटुंबिय. श्री विजयसिंह मोहिते पाटील यांना मानणारा सुद्धा एक मोठा गट तिथे आहे. बहुतांश निवडणुका तिहेरी झालेल्या आहेत. मागच्या दोन वेळा (2014, 19) उद्योजक श्री समाधान आवताडे हे सुद्धा रिंगणात होते. त्यामुळे या लढती चुरशीच्या झाल्या होत्या.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा क्षेत्रात जवळपास तीन लाख पन्नास हजार मतदाता आहेत. मागच्या खेपेला म्हणजे 2019 मध्ये 72% टक्के म्हणजे जवळपास दोन लाख चाळीस हजार एवढी मते पडली होती. त्याआधी 2014 मध्ये 76% म्हणजे दोन लाख एकोणतीस हजार पाचशे मते पडली होती.
म्हणजे, साधारण परिस्थितीमध्ये येथे 70% मतदान होणे हे शक्य आहे. यावर्षी कोरोना महामारीच्या अनुषंगाने मतदानाचा टक्का घसरतो का अशी भीती आहे. साहजिक आहे.
जेवढे मतदान अधिक, भाजपच्या विजयाची खात्री तेवढी वाढते असे साधारणपणे आढळते. याला कारण आहे, कॉन्ग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचा 80-90% मतदार बाहेर पडतो, भाजपचा मतदार शहरी-निमशहरी असल्यामुळे त्यातील 60-65% मतदार बाहेर पडतात. यावेळी हे चित्र बदलायचे असेल तर भाजपच्या कार्यकर्त्यांना पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरावे लागेल.
यंत्रणा, अफवा, कोरोनाची भीती या गोष्टींवर त्यांना काबूत ठेवून प्रामाणिकपणाने मैदानात उतरावे लागणार आहे.
भाजपकडे यावेळी एक नाही तर दोन उमेदवारांचे बळ आहे असे म्हंटले जाते. ते खरेही आहे. मागच्या निवडणुकीत श्री परिचारक आणि श्री आवताडे यांच्या मतांची बेरीज एक लाख तीस हजारावर जाते, भालके यांना जवळपास नव्वद हजार (89787) मते मिळाली होती, यावेळी हे दोन्ही उमेदवार एकत्र झाल्याने साधी गोळाबेरीज श्री भालके यांच्या विरुद्ध जाते.पण हे एवढे सोपे असते? मतांचे हस्तांतरण (transfer of votes) एवढे सहजासहजी होत नाही.
मात्र राजकारणात पक्षांची युती किंवा उमेदवारांची युती नेहमी, शंभर अधिक शंभर दोनशे अशी होतेच असे नाही. विशेषतः जेव्हा दोन्ही एकमेकां विरुद्ध लढले असतिल तर."अ" उमेदवारावर नाराज असलेल्या मतदारांची "ब" उमेदवाराला मतदान करण्याची शक्यता असते, बर्याच प्रमाणात तसे घडते सुद्धा (70-80% प्रमाणात, जर व्यवस्थित प्रचार केला तर). आणि त्याच पद्धतीने, "ब" उमेदवारावर नाराज असलेल्या मतदारांची "अ" उमेदवाराला मतदान करण्याची शक्यता असते. मात्र, जेव्हा "अ" आणि "ब" जेव्हा एक होतात तेव्हा हे नाराज़ मतदार कुठे जातील? एकतर मतदान करणार नाहीत किंवा दुसर्याच उमेदवाराला पाठिंबा देतील.
कार्यकर्ते सुद्धा मतदारांसारखे वागू शकतात. त्यामुळे हे गणित एवढे साधे सरळ नसते. जसाजसा मतदानाचा दिवस जवळ येतो, तसातसा उमेदवाराला, जो व्यक्ति लढत नाही त्याव्यक्तीवर (आणि त्यांच्या यंत्रणेवर) जास्त प्रमाणावर अवलंबून रहावे लागते. ही वस्तुस्थिती होते.
सद्यः परिस्थितीत राज्यातील भाजप नेतृत्व सक्षमपणे मांड मारून आहे. आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी नेते मजबूतीने मैदानात उतरले आहे. उद्या मात्र पक्षाच्या यंत्रणेचा कस लागेल.
साद नागरिकांना…
"एलिझाबेथ एकादशी" या सिनेमात पंढरपूरमधील आषाढी एकादशीच्या उत्सवाचे उत्कृष्ट पणे सादरीकरण केले आहे. पंढरपूरची अर्थव्यवस्था देवस्थान, आणि देवदर्शनाला येणार्या भाविक यांवर अवलंबून आहे. स्थानिकांचे छोटे मोठे व्यापार आहेत, शिर्डी सारखीच परिस्थिती आहे, मात्र शिर्डी मध्ये व्यावसायीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे त्यामुळे तिथले विषय थोड्याफार प्रमाणात वेगळे असू शकतात.
२०१९ मध्ये पावसापासून बचावासाठी जवळपास पाच लाख वारकऱ्यांना काही संघटनाकडून रेनकोट दिले गेले होते. यावेळी मात्र वारकरी नाही, तर स्थानिक नागरिकांना हाक घालायची आहे. 2019 मध्ये महापूर आणि आता कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून पंढरपुरातील स्थानिक अर्थव्यवस्था कोमेजली आहे.
एकजुटीने आणि मजबूतीने प्रचार..
पंढरपुर-मंगळवेढा विधानसभा क्षेत्रात धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्याच अनुषंगाने भाजपकडून धनगर समाजात लोकप्रिय होत असलेल्या श्री गोपीचंद पडळकर हे मोठ्या प्रमाणावर प्रचार करताना दिसले. माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा अनेक प्रचारसभा घेतल्यात.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे नेते येथे अनेक दिवसांपासुन तळ ठोकून आहेत. आघाडीचे नेते या महामारीच्या काळात भाजपने उमेदवार देऊन निवडणुक घडवून आणली हे साधारण मतदाराच्या मनात रुजवण्यात मशगूल दिसली. निवडणुकप्रचार करतांना आघाडीच्या अनेकांनी (ऐंशी तास सोबत असलेल्यांनी सुद्धा) भाजप नेत्यांवर अत्यंत अश्लाघ्य शब्दात वैयक्तिक टीका केल्या. प्रचार तोफा आता मात्र थंडावल्या आहेत.
आता मात्र संपूर्ण मदार कार्यकर्त्यांवर आणि बूथ मैनेजमेंट वर राहणार. आपल्याला अनुकूल असलेल्या लोकांना मतदानाला बाहेर पडायला प्रोत्साहित करून त्यांना बूथ वर घेऊन येणे हे महत्वाचे ठरणार आहे.
जाता जाता..
उद्या मतदानाचा आकडा अडीच लाख किंवा त्याला पार करतो का हे बघणे उत्सुकतेचे ठरेल. सद्यः परिस्थितीत याची शक्यता कमी वाटते. दोन लाखाच्या आसपास मतदान होण्याची शक्यता आहे. काहींना, हे नकारात्मक वाटत असले तरी, त्याला कारण हे की, ही एका विद्यमान आमदाराच्या निधनामुळे होणारी पोटनिवडणूक आहे, आणि दोन मोठे व्यक्तिमत्व सोबत आले आहे त्यामुळे मतदाता तेवढेच उत्साही राहतील का? मतदाता उत्साही राहीलच असे गृहीत धरणे धाडसाचे ठरेल.
येथील मतदार नेमके कुणाला कौल द्यावा या संभ्रमात असावा. राज्यात आजघडीला जे सरकार आहे त्याला बळ देऊन आपल्या विभागाचा "तथाकथित" विकास घडवून आणावा, की या सरकारच्या अस्तित्वाला नाकारून, राज्यात घडणार्या महिला विरोधी घटना यांना डोळ्यासमोर ठेवून, किंवा शेतकर्याची होणारी फरफट, विजेचे अनाठायी बिल, वीज कापणी, कोरोना महामारी मुळे सामान्य माणसाची होत असलेली तडफड यांना डोळ्यापुढे ठेवून बदल घडवावा?
मात्र, भाजपने अनेकदा प्रतिकूल परिस्थितीत बाजी मारली आहे. 2019 लोकसभेच्या निवडणुकीत माढा आणि सोलापूर सारख्या जागा जिंकून पश्चिम महाराष्ट्राचे राजकारण आपल्याला जमू शकते हे भाजपच्या राज्यातील नेतृत्वाने सिद्ध केले. गेल्या वेळी बारामती मध्ये विधानसभा निवडणुकीत सुद्धा भाजपला बर्यापैकी असे अनुकूल असे वातावरण निर्माण झाले होते. गेल्या दीड वर्षात माढाचे विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर हे अनेकदा दिल्लीत केंद्रित नेतृत्वाला भेटताना दिसले. स्थानिक नेते हर्षवर्धन पाटील हे सुद्धा पंढरपूर येथील प्रचारात सहभागी झालेले दिसले.
कागदावर आघाडीची सरशी दिसत असली तरीही, कुणीतरी आतून दार उघडेल का? अर्थात, दारे सगळीकडे असतात त्यामुळे, हा विचार दुधारी तलवारीला तेल लावण्यासारखे आहे. एक मात्र खरे, इथे जर भाजप जिंकली तर तो फार मोठा विजय होईल.त्याचे अनेक दूरगामी परिणाम होतील, नवीन प्रवाह तयार होतील. आम्हालाच "सत्तेचा अमरपट्टा" मिळाला आहे असा विचार करणार्या मंडळीला एक मोठी वॉर्निंग असेल. राजकारणात मगरूरी करून चालत नाही, जनतेसाठी राबणे गरजेचे असते हे अधोरेखित होईल.
असो, दोन मे ला निवडणुकीचा निकाल येईल तेव्हा कळेल - एक अधिक एक किती होतात ते. की भाजपचे एकशे सहा आमदार होतील? की राज्यात "ऑपरेशन कमळ" सक्रिय होईल? राज्यात नवीन पात्रांसोबत पुन्हा एकदा "मैत्रीचा कोथळा" किंवा " ट्रोजन हॉर्स" (क्लीक करून वाचा) चे अंक रंगतील का?
कालाय तस्मै नमः.
- धनंजय मधुकर देशमुख, मुंबई
(लेखक, स्वतंत्र मार्केट रिसर्च विश्लेषक आहे. पोस्टमधील माहिती, आकडेवारी, कविता, फोटो इंटरनेट वरुन साभार घेतले आहे.)
Comments
Post a Comment