04 एप्रिल 2021, मुंबई
मैत्रीचा कोथळा, ट्रोजन हॉर्स, डॉमिनो इफेक्ट, आणि ऐकीडो...
मैत्रीचा कोथळा..
24 ऑक्टोबर 19 ला राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले, देवेंद फडणवीस यांच्या स्वछ ,पारदर्शक आणि
प्रगतिशील कार्यपद्धतीला राज्यातील जनतेने भरभरून प्रतिसाद दिला.त्यांच्या
नेतृत्वाखाली भाजप शिवसेना महायुतीला 161 जागा म्हणजेच निर्भेळ बहुमत मिळाले, काही अपक्ष धरून त्यांचा आकडा 175 पर्यंत सहज पोहोचला असता.पण राज्याच्या बारा कोटी जनतेला "मैत्रीचा कोथळा (आतड्या) काढणे " नावाच्या गनिमी काव्याचा विशेष प्रयोग बघायला मिळाला. महायुती तुटली, कदाचित शिवसेनेच्या नेत्यांनी 24 लाच या अंकाचा प्रयोग करण्याचे ठरविले होते. शिवसेना आणि भाजप मधील संवाद तुटला आणि नवीन समीकरणे जुळवून आणण्याचे प्रयोजन सुरू झाले..
ट्रोजन हॉर्स..
"ट्रोजन हॉर्स" ची कथा किंवा संकल्पना अनेकांनी वाचली असेल, बघितली असेल, अनुभवली असेल. अत्यंत जुनी पण प्रभावी रणनीती आहे ही. आपला गुप्तहेर किंवा सैन्य असलेली यंत्रणा आपल्या विरोधकांच्या किंवा दुष्मनाच्या गोटात पाठवावी ज्याचा सुगावा त्यांना येणार नाही. हा गुप्तहेर किंवा सैनिक त्यांच्या गोटातील संवेदनाशील माहिती (सैन्यबळ, गुप्तबाबी) पद्धतशीरपणे त्याच्या वरिष्ठ अधिकार्यांना पाठवतो, आणि नंतर एका गाफील क्षणी, विरोधकांवर हल्ला होतो ज्यात ते हरतात.
ट्रोजन हॉर्स या संकल्पनेचा वापर इस्राएलच्या मोसाद या गुप्तहेर संस्थेने अगदी चपखलपणे केला होता. 1966-67 मध्ये एली कोहेन हा त्यांचा हेर एका व्यापाराची ओळख घेऊन (तोतया नाव घेऊन) सिरिया मध्ये प्रवेश घेतो, कालांतराने तो तेथील सर्वोच्च नेत्यांमध्ये आपली उठबस निर्माण करतो. आणि महत्त्वाची माहिती आपल्या मायदेशी इस्राएलमधील वरिष्ठ अधिकार्यांना पुरवितो. त्याच्या माहितीच्या बळावर इस्राएल सैन्य सिरीयावर आक्रमण करते, ज्यात सिरियाला प्रचंड नुकसान होते, आणि सिरियातील असाद यांची राजवट पडते. दुर्दैवाने एली कोहेन पकडला जातो आणि त्याला सिरीयन लष्करी अधिकारी त्याला भर रस्त्यावर फासावर लटकवतात. (नेटफ्लिक्सवर या विषयावर "द स्पाय" नावाची वेब सिरीज आहे). असो.
थोडक्यात ट्रोजन हॉर्स ही संकल्पना आजपण प्रभावीपणे वापरली जाते, विशेष करून राजकारणात! 23 नोव्हेंबर 19 च्या पहाटेला झालेल्या शप्थविधीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या, दुर्दैवाने देवेंद्र फडणवीस यांनी 80 तासात राजीनामा दिला. मात्र या घटनेनंतर, अनेकांनी, भाजपला "ट्रोजन हॉर्स" चा प्रयोग पाहिजे तसा जमला नाही अश्या प्रतिक्रिया दिल्यात, तर दुसर्या गटाकडून आम्हीच त्यांना "ट्रोजन हॉर्स" म्हणुन भाजपकडे पाठविले होते अश्या आवया उठवण्यात आल्या. असो, थोडक्यात काय एक अंक संपला! त्याचे चांगले अथवा वाईट परिमाण येणार्या काळात दिसतीलच.
डॉमिनो इफेक्ट..
यानंतर आठवड्याभरातच राज्यात महाआघाडी सरकार स्थानापन्न झाले. तीन पक्षीय, एकमेकांना प्रतिकूल असणार्या विचारधारा, भिन्न-भिन्न राजकीय महत्त्वाकांक्षा, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे परस्पर विरोधी कार्यपद्धती या बाबी दिसत असताना सुद्धा हे सरकार स्थापन झाले. अनेकांना वाटले हा पत्त्यांचा बंगला आहे, 6-12 महिन्यात वारा येईल आणि बंगला...
पण तसे झाले नाही. खरे तर या पक्षांनी एकमेकांच्या मागे पूर्णपणे आपापली शक्ति लावली. एका दारामागे दुसरे मोठे दार. काहींना वाटले, यातील एकाच्या चुकीच्या बाबी पुढे आल्यात तर त्याचा "डॉमिनो इफेक्ट" होईल, म्हणजे आधी लहान-सहान दारे पडतील मग मोठी आणि शेवटी सगळी मोठी दारे पडतील, भिंती ढासळतील, आणि सर्वात शेवटी बुरुज कोसळलेल. परन्तु....
सुरुवातीच्या काही महिन्यात तिन्ही पक्षांमध्ये कुरबुरी आहे अश्या बातम्या येऊ लागल्या, काहींचे वक्तव्य सुद्धा. एखादे लहान दार पडते की काय अशी अपेक्षा निर्माण झाली पण काही नाही झाले. कालांतराने निधि वाटप, अधिकारी मंत्र्यामधील असमन्वय, सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण, ड्रग्स, कोरोना महामारीची हाताळणी, काही नेत्यांवर इडिची चौकशी लागली इत्यादी बाबींवरुन पुन्हा "डॉमिनो इफेक्ट" होतो का असे वातावरण तयार झाले पण........
आता गेल्या दीड महिन्यांपासून काही गंभीर बाबी घडल्यात - उदाहरणार्थ, पुण्यातील एका युवतीच्या मृत्यूमुळे एका मंत्री महोदयांना राजीनामा देण्याची वेळ , मोठ्या उद्योजकाच्या घराजवळ आढळलेली "जिलेटिनयुक्त" कार, मुंबईतील बार मालकांकडून महिना शंभर कोटी वसूल करून घेण्याचा एका पोलीस अधिकाऱ्याचा एका ज्येष्ठ मंत्रीमहोदयांवर आरोप, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लिहिलेले पत्र, 6.3 जीबी "डेटायुक्त" पुरावे असलेले बदली प्रकरण किंवा अजून काही तत्सम बाबी. अनेकांचे नाव बाहेर येत आहेत, चौकश्या लागल्या, काही ताशेरे सुद्धा आले पण भिंती सध्यातरी शाबूत आहेत. कदाचित काही दारं पडले असले तरीही ते एकमेकांवर नाही पडलेत, त्यामुळे आता असे आढळते की ही सगळे दारे "सेफ डिस्टनसिंग" करून लावली आहेत.
ऐकीडो..
ऐकीडो ही एक जापानमधील एक अत्यंत जुनी स्व-रक्षणासाठी मार्शल आर्ट आहे. काही दिवसांपूर्वी कॉन्ग्रेस नेते राहुल गांधी यांनी केरळमध्ये निवडणूक प्रचार करतांना एका महाविद्यालयातील मुलींना ऐकीडो बद्दल प्रात्यक्षिक घेऊन माहिती दिली. निमित्त काहीही असली तरीही युवतींना माहिती उपयुक्त वाटली असावी.ऐकीडो मध्ये ज्याला स्वतःचे रक्षण करायचे आहे ती व्यक्ति समोरच्या व्यक्तीच्या शक्तीचा वापर करून त्यांना थोपवून ठेवू शकते, तीही स्वतःची फारशी ताकद ना वापरता! असो.
सध्या राज्याच्या राजकिय पटलावर "ऐकीडो"चा डाव रंगलाय का? दोन्ही बाजूनी त्याचा वापर होताना दिसतोय. भाजप नेतृत्वाला त्यांच्या 105 आमदारांना, आणि पक्षातील इतर नेत्यांना सोबत ठेवण्याचे आवाहन आहे.
गेल्या दीडवर्षाच्या काळाचा जर बारकाईने आकलन केले तर, वरील तिन्ही रणनितीचा वापर महाआघाडी आणि भाजप एकमेकांवर करताना दिसू शकतात.
जाता जाता..
राज्यातील तीन पक्षाचे सरकार अनैसर्गिक आघाडीतून निर्माण झाले असले तरीही कायद्याने अधिकृत आहे. जनतेच्या मनातले नसले तरीही. अनैसर्गिक आहे, पण अनधिकृत नाही. एखाद्या मार्केट मध्ये मोठ्या साहेबाची गाडी येते आणि अनधिकृत दुकाने बंद होतात, ही कल्पना अनेकांना भावते, पण हे राज्याचे राजकिय पटल आहे.
देशात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका सुरू आहेत. आसाम आणि तामिळनाडू मध्ये भाजप, एनडीए आपली सत्ता राखण्यात यशस्वी होईल असे संकेत आहेत. पश्चिम बंगाल मध्ये यंदा सत्ता परिवर्तन घडणार असे स्पष्ट दिसतेय. शेवटी सत्तेचा अमरपट्टा कुणालाच मिळत नाही, तो विश्वासाने कमवावा लागतो, राखायचा असतो.
महाराष्ट्रात सत्तेचा पट्टा कुणाच्या दंडावर किती काळ राहतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. विशेषत, काही दिवसांपुर्वी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली असे वृत्त आहे. जर हे खरे असले तर काही नवीन शिजतय का? भविष्यात पक्षातील घडी नीट लावणे किंवा सद्यपरिस्थितीतील गुंतागुंत सोडवणे यावरून खल झाले असतिल का?
2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाने, "आम्ही भाजपला बाहेरून पाठिंबा देऊ" असे जाहीर केले होते, अर्थात ते घडले नाही, पण त्याचा व्हायचा तो परिणाम झाला. शिवसेनेच्या नेत्यांनी भाजप नेतृत्वाला सोबत येण्याचे संकेत दिले, आणि पुढचे पाच वर्षे त्यांचे सरकार चालले. अर्थात थोड्याफार कुरबुरी झाल्या होत्या, पण तुटातूट झाली नव्हती.
कदाचित याही वेळेस असे काही घडू शकते का? अर्थात, कोण कुणावर किती विश्वास ठेवेल हा विषय आहे. पण या खेळीने पुढचे 8-12 महिने निघू शकतात, त्यानंतर मध्यावधि लागल्या तरी चालतील या अपेक्षेने या विचाराला गती मिळु शकते.
येत्या 2 मे ला पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. या दरम्यानच्या काळात म्हणजे पुढच्या दोन आठवड्यात काय घडामोडी होतात हे बघणे औत्सुकतेचे ठरेल. महाराष्ट्राच्या राजकिय पटलावर कुठला खेळ रंगतो हे दिसेलच - मैत्रीचा कोथळा, ट्रोजन हॉर्स, डोमिनोज इफेक्ट की ऐकीडो? कि यावेळी काही नवीनच? कारण, भाजपच्या कार्यपद्धतीत नेहमी "एक्स-फॅक्टर" बघायला मिळतो, तेव्हा लक्ष ठेवून राहूया, गोड बातमी येते का यावर- तसाही काही दिवसांत चैत्र पाडवा येतोच आहे!
एक मात्र खरे, जर असे काही घडण्याचे असेल तर राज्य भाजपला आपल्या कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यावे लागेल. अर्थात समाजकार्याचे ध्येय, आणि देशाचं भविष्य घडविण्याचा ध्यास या दोन बाबी अश्या आहेत की ते सत्ता हातात असल्यातर जास्त व्यवस्थितपणे पार पाडू शकल्या जातात. कुणीतरी म्हंटले आहे -
स्वप्नं साकार होऊ शकतात, भ्रम नाही,
स्वप्नं पूर्ण करायचे असतात, आणि भ्रम तोडायचे असतात.
(सत्तेचा अमरपट्टा आमचाच आहे हा सुद्धा एक भ्रमच आहे).
- धनंजय मधुकर देशमुख, मुंबई
(लेखक, स्वतंत्र मार्केट रिसर्च विश्लेषक आहे. पोस्टमधील माहिती, आकडेवारी, कविता, फोटो इंटरनेट वरुन साभार घेतले आहे.)
Comments
Post a Comment