23 एप्रिल 23, मुंबई
उद्योगांवर बोलू काही - विदर्भात उद्योगांची भरारी गरजेची!
पीएम मित्रा योजनेअंतर्गत केंद्र सरकारने अमरावतीमध्ये 'मेगा इंटीग्रेटेड टेक्सटाईल पार्क' घोषित केला आहे. देशात सात शहरांत अशाप्रकारचे पार्क होणार असून यामध्ये अमरावतीचा समावेश आहे. अमरावतीसह गुजरात, मध्य प्रदेश, तामिळनाडू, तेलंगण, कर्नाटक व उत्तर प्रदेश याठिकाणी पीएम मित्रा योजनेअंतर्गत सदर प्रकल्प उभारले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सातही प्रकल्पांसाठी चार हजार कोटीची गुंतवणूक होणार आहे.
उद्योगांवर बोलू काही - विदर्भात उद्योगांची भरारी गरजेची!
पीएम मित्रा योजनेअंतर्गत केंद्र सरकारने अमरावतीमध्ये 'मेगा इंटीग्रेटेड टेक्सटाईल पार्क' घोषित केला आहे. देशात सात शहरांत अशाप्रकारचे पार्क होणार असून यामध्ये अमरावतीचा समावेश आहे. अमरावतीसह गुजरात, मध्य प्रदेश, तामिळनाडू, तेलंगण, कर्नाटक व उत्तर प्रदेश याठिकाणी पीएम मित्रा योजनेअंतर्गत सदर प्रकल्प उभारले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सातही प्रकल्पांसाठी चार हजार कोटीची गुंतवणूक होणार आहे.
अमरावतीच्या प्रकल्पात १० हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. नांदगाव पेठ औद्योगीक वसाहतीजवळील पिंपळविहीर येथे सदर प्रकल्प होणार आहे, जवळपास ३ लाख लोकांना रोजगार त्यातून मिळणार आहे.
‘पाच एफ’ अर्थात ‘फार्म टू फायबर टू फॅक्टरी टू फॅशन टू फॉरेन’ याअंतर्गत सदर प्रकल्प उभारले जाणार आहेत. सदर प्रकल्पासाठी केंद्र सरकार ७०० कोटी खर्च करणार असून या पार्कचे मार्केटिंग केंद्र सरकार राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर करणार आहे. यातूनच अनेक मोठे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ब्रँड अमरावतीला येणार असल्याची माहिती आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच अमरावती भेट दिली होती, तेव्हा येथे रेमंड उद्योग देशातील सर्वांत मोठी गुंतवणूक करणार आहे व याशिवाय अन्य पाच ते सहा प्रकल्पदेखील येथे येणार असल्याची माहिती दिली.
सन २०२७-२८ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल. एक हजार हेक्टरमध्ये हा प्रकल्प आहे. यातील ४१३ हेक्टर जागा आवश्यक आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात पिंपळविहीर येथील २४२.८९ हेक्टर व दुसऱ्या टप्प्यात पिंपळविहीर व डीगरगव्हान येथील १७०.१८ हेक्टर जागेचे भूसंपादन करण्यात येत आहे. यासाठी १६३ कोटींचा शासन निधी देण्यात आलेला आहे.
अमरावतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले जाणार आहे. बेलोरा विमानतळावरून रात्रकालीन उड्डाण सुविधा, रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात क्रीडा विद्यापीठ, शिवछत्रपती उद्यान, अशा विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अमरावती शहराचे गतवैभव परत मिळवून देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. मात्र त्यासाठी विभागातील उद्योजकांना सुद्धा पुढाकार घ्यावा लागणार आहे. स्थानिक उद्योजकांनी खरेदी-विक्रीच्या पलिकडे जाऊन -तयार करणे, बनविणे, स्थानिक बाजारात विकणे किंवा निर्यात करणे या बाबींवर लक्ष केंद्रित करावे लागेल.
विदर्भातील पायाभूत सुविधा आणि उद्योग निर्मिती साठी गेल्या तीन दशकात झाले नाही ते प्रयत्न मागच्या काही वर्षांत झाले आहे. नागपुर मधील आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो, मिहान प्रकल्पात येणार्या इन्फोसिस, TCS सारख्या मोठमोठ्या संस्था, आयआयएम सारखी शिक्षण संस्था, एम्स सारखे अद्ययावत इस्पितळ, रेल्वेच्या वाढत्या खेपा, विदर्भाला राज्यातील प्रमुख शहरांना जोडून, लवकरच विदर्भातील उत्पादकांना बाजारपेठ मिळवून देणारा महासमृद्धी महामार्ग, असे अनेक प्रकल्प आहेत ज्यांच्यामुळे विदर्भातील बाजारपेठा, राहणीमान बदलणार आहे. साहजिकच आहे यामुळे उत्पादकांना आणि उद्योजकांना अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.
विशेष म्हणजे, पर्यटन हा विषय सध्याच्या केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या प्राथमिकतेमध्ये वरच्या क्रमांकावर आहे. उदाहरण द्यायचे झाले तर, ' विदर्भाचे काश्मीर म्हणून ओळख असलेल्या अमरावतीच्या चिखलदरा येथे स्काय वॉक सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध होणार आहे. हा स्काय वॉक भारतातील पहिला असून जगातील तिसरा आहे. मेळघाटच्या चिखलदरातील गोराघाट पॉईंट पासून ते हरीकेन पॉईंटपर्यंत स्काय वॉक ४०७ मीटरचा स्काय वॉक तयार झाल्यानंतर आता येथे राज्यातूनच नव्हे देश-विदेशातून पर्यटकांची गर्दी वाढेल.
एकीकडे, राज्याच्या उपराजधानीला साजेसे असे रूप नागपुर घेत आहे. दुसरीकडे शिक्षण, उद्योग, पायाभूत सुविधा वाढत असताना, शहरात मोठ्या प्रमाणावर छोटे उद्योग आणि पांढरपेशे रोजगार निर्मिती होत होती. मात्र आता एक सुरवंट, सुंदर आणि मोठ्या फुलपाखरू मध्ये आपले रूप पालटते आहे.
राज्यात आणि विभागातील राजकीय वातावरण उद्योगांसाठी पोषक असताना, विभागातील नेते सक्षम असताना तेथील उद्योजकांनी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पुढाकार घेतला पाहिजे. एकदा मॅन्युफॅक्चरिंग कंपनी सुरळीत कार्यरत झाल्या की त्यांना सेवा देणार्या कंपन्या आपसूकच येतात, त्यानंतर एक प्रकारची Ecosystem तयार होते.
कुठल्या क्षेत्रात संधी?
बघायला गेले तर अनेक क्षेत्रे आहेत जिथे विदर्भातील उद्योजक, किंवा राज्यातील मोठे उद्योजक विदर्भात सुरू करू शकतात.
प्रामुख्याने टेक्स्टाइल, टेक्निकल टेक्स्टाइल, ग्रीन हायड्रोजन, सौर ऊर्जा प्रकल्प, किंवा सौर ऊर्जा उत्पन्न करणारी उत्पादने, डेटा सेंटर, कोल्ड स्टोरेज, फूड प्रोसेसिंग, ग्रेड A वेअरहाऊस, इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स, इलेक्ट्रॉनिक उत्पादने (घरगुती वापराच्या वस्तु), इलेक्ट्रॉनिक हॉबी किट्स, शेतीसाठी लागणारे नवीन तंत्रज्ञान, सेंसर वर चालणारी अवजारे, ड्रोन वापरुन शेतकी सेवा (फवारणी) आणि अनेक.
केस स्टडी - टेक्निकल टेक्स्टाइल्स उद्योग
पुढच्या ४-५ वर्षात भारतीय टेक्निकल टेक्स्टाइल्स उद्योग $ ४० बिलियन पर्यन्त नेण्यासाठी केंद्रसरकार प्रयत्नशील. भारत सध्या ५वा मोठा पुरवठादार आहे. राज्यातील कापूस दुसर्या राज्यात जातो. अमरावती येथील घोषित मेगा-टेक्स्टाइल पार्क येथे टेक्निकल टेक्स्टाइलचा सुद्धा विचार होऊ शकतो.
टेक्निकल टेक्सटाईल्स (तांत्रिक वस्त्रे)ही एक निश्चित गुणवत्ता असलेली अभियंता उत्पादने आहेत. टेक्निकल टेक्सटाईल नैसर्गिक तसेच मानवनिर्मित तंतू जसे की Nomex, Kevlar, Spandex, Twaron यांचा वापर करून उत्पादित केले जातात जे उच्च ताप, उत्कृष्ट इन्सुलेशन, सुधारित थर्मल प्रतिरोधकता इत्यादी गुणधर्म प्रदर्शित करतात.
मजबूत मूल्य साखळीसह कापूस, लाकूड, ताग आणि रेशीम यासारख्या कच्च्या मालाची उपलब्धता, कमी किमतीचे श्रम, वीज आणि ग्राहकांचा बदलता कल हे या क्षेत्रातील भारताच्या वाढीस पूरक घटक आहेत. वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सर्वेक्षणानुसार, भारताच्या तांत्रिक वस्त्रोद्योग बाजाराने 2017-18 मधील $16.6 अब्जवरून 2020-21 पर्यंत $28.7 अब्जपर्यंत 20% ची वाढ+टेक्निकल टेक्सटाईलअंतिम वापरावर अवलंबून बर्याच श्रेणींमध्ये विभागले जाऊ शकते. टेकटेक्स्टिल, मेसे फ्रँकफर्ट यांनी विकसित केलेले वर्गीकरण मोठ्या प्रमाणात वापरले जाते.
- अग्रोटेक (अग्रो-टेक्सटाइल्स)- तांती-गारवा/पक्षी संरक्षण जाळी, फिनिशिंग जाळी, क्रॉप कव्हर, मॅट, शेडनेट आणि इतर
- बिल्डटेक (कन्स्ट्रक्शन टेक्सटाइल्स)-काँक्रीट मजबुतीकरण, पाया प्रणाली, अंतर्गत बांधकाम, इन्सुलेशन, प्रूफिंग सामग्री, वातानुकूलन, ध्वनी प्रतिबंध, दृश्य संरक्षण, सूर्यापासून संरक्षण, इमारत सुरक्षा. स्थापत्य पडदे, फरशी आणि भिंतींचे आवरण, मचान जाळी, आवरण आणि कॅनोपी, एचडीपीई ताडपत्री
- क्लॉथटेक (क्लोदिंग टेक्सटाइल्स) - फास्टनर, छत्री कापड, शिवण धागे, इंटरलाइनिंग, लेबल्स, लवचिक अरुंद कापड, बूटलेस आणि इतर.
- जिओटेक (जिओ-टेक्सटाइल्स)- बंधाऱ्यांच्या मजबुतीकरणात किंवा बांधकामकार्यात वापरले जाते.
- होमटेक (डोमेस्टिक टेक्सटाइल्स)- अंतर्गत सजावट, फर्निचर, कार्पेटिंग, उन्हापासून संरक्षण, कुशन सामग्री, फायरप्रूफिंग, फरशी /भिंतीचे आवरण, कापड प्रबलित रचना / फिटिंग्स, फर्निचर कापड, फायबरफिल, भरलेली खेळणी, ब्लाइंडस, गादी/उशी घटक, कार्पेट बॅकिंग, मच्छरदाणी, व्हॅक्यूम क्लीनर फिल्टर
- इंडटेक (इंडस्ट्रियल टेक्सटाइल्स) - मेकॅनिकल आणिरासायनिक अभियांत्रिकीशी संबंधित. इंडस्ट्रियल ब्रश, पेपर मेकिंग फॅब्रिक, फिल्ट्रेशन प्रॉडक्ट्स, कॉम्प्युटर प्रिंटर रिबन, प्रिंटेड सर्किट बोर्ड, कंपोझिट, कॉर्ड, एजीएम ग्लास बॅटरी सेपरेटर, बोल्टिंग कापड, ड्राइव्ह बेल्ट,कन्व्हेयर बेल्ट
- मेडीटेक / मेडटेक्स (वैद्यकीय कापड)- पट्टी आणि टाके (जखम शिवणे). सर्जिकल ड्रेसिंग, कॉन्टॅक्ट लेन्स, कृत्रिम प्रत्यारोपण, बेबी डायपर, असंयम डायपर, सॅनिटरी नॅपकिन, सर्जिकल टाके, सर्जिकल डिस्पोजेबल आणि इतर. मेडिकल टेक्सटाइलमध्ये सर्जिकल गाउन आणि ड्रेप्सदेखील समाविष्ट आहेत.
- मोबिलटेक-ऑटोमोबाइल्स, विमान, रेल्वे, जहाज बांधणी. नायलॉन टायर कॉर्ड फॅब्रिक, सीट कव्हर फॅब्रिक/अपहोल्स्टरी, सीटबेल्ट, केबिन फिल्टर, टफ्टेड कार्पेट, हेल्मेट, इन्सुलेशन,इंटिरिअर कार्पेट, सनव्हिझर/सनब्लाइंड, हेडलाइनर, एअरबॅग्ज, सीटबेल्ट वेबिंग, कारकव्हर, एअरलाइन डिस्पोजेबल्स,वेबिंग
- ओकोटेक किंवा इकोटेक- पर्यावरण अभियांत्रिकी आणि लँडफिल कचरा व्यवस्थापन (नगरपालिका किंवा धोकादायक कचऱ्याच्या गळतीपासून लँडफिल सुरक्षित करण्यासाठी भूसिंथेटिक उत्पादने); रासायनिक / तेल उद्योगांमध्ये दुय्यम संरक्षण (टाकी गळतीसाठी दुय्यम प्रतिबंध म्हणून ग्राउंड कव्हर).
- पॅकटेक (पॅकेजिंग टेक्स्टाईल)- लेनो बॅग, रॅपिंग फॅब्रिक, जूट आणि बोरे, सॉफ्ट लगेज उत्पादने, टी बॅग फिल्टर पेपर, विणलेली पोती.
- प्रोटेक (प्रोटेक्टिव्ह टेक्सटाइल्स)-अग्निशामक कपड्यांसाठी उष्णता आणि किरणोत्सर्गापासून संरक्षण, वेल्डर्ससाठी वितळलेल्या धातूंपासून, बुलेटप्रूफ जॅकेट
- स्पोर्टटेक (स्पोर्ट्स टेक्सटाइल्स) - तंबू, स्विमवेअर, पादत्राणे घटक, क्रीडा जाळी, स्लीपिंग बॅग, गरम हवेचे फुगे, पॅराशूट फॅब्रिक, कृत्रिम टर्फ, स्पोर्ट्स कंपोझिट आणि इतर.
नवीन उद्योग सुरू करताय?
एखादा उद्योग संपुर्ण-नवीन पणे सुरू करावयाचा असेल किंवा आहे तोच वाढवायचा असेल किंवा त्यात नवीन उत्पादके जोडायची असेल तर, सर्वप्रथम शास्त्रोक्त पद्धतीने एक मार्केट स्टडी करणे आवश्यक आहे. ही कुठलाही स्वतंत्र सल्लागार किंवा मार्केट रिसर्च कंपनी करू शकते.
या मार्केट-स्टडी मध्ये, आपण निवडलेल्या उत्पादकाला किती मार्केट राहणार, कुठे राहणार, कोण-कोण बनवितो, त्यांचेकडे काय सुविधा आहे, ते कसे मार्केटिंग / जाहिरात करतात, किती किमतीत उत्पाद विकला जातो, आपण काय नावीन्य आणू शकतो, भविष्यात आपल्या ब्रँडला कसा वाव राहील हे आणि इतर अनेक बाबींचा अभ्यास केला जातो.
या मार्केट स्टडी सोबत अनेक सल्लागार आहेत जे नवीन उद्योजकाला अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत कामात येईल असा एक तपशीलवार प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून देतात, त्यात - जमीन, भांडवल, परवानग्या, रजिस्ट्रेशन, मशीनरी, प्लांट उभारणी, मार्केट स्टडी, मॅनपावर, मार्केटिंग इत्यादी अनेक बाबींवर प्रकाश टाकला जातो.
प्रत्येक उद्योग हा अंतर्गत किंवा बाह्य घटकांनी प्रभावित होतो, ते प्रत्येक उद्योजकाने समजून घेणे आवश्यक आहे. याला "इंडस्ट्री-ॲनालिसिस" म्हणता येईल. कुठल्याही उद्योगाला साधारणतः 5 घटक प्रभावित करतात.
- प्रत्येक उद्योगात अंतर्गत स्पर्धा असते, त्याला स्पर्धा किंवा रायवलरी म्हणतात.
- प्रत्येक उद्योगात कधी-कधी प्रतिरूप प्रॉडक्ट येण्याची भीती असते, तुमच्या उद्योगासाठी धोका होऊ शकतो. याला “थ्रीट फ्रॉम सबस्टिट्यूट” म्हणतात. उदा. प्लास्टिक ऐवजी पेपर पॅकिंग किंवा टेक्नोलॉजी बदल
- कोणतेही उत्पादन तयार करण्यासाठी कच्चा माल लागतो. त्याचे पुरवठादार तुम्हाला वेठीस धरू शकतात, ते सौदेबाजी करू शकतात. याला पुरवठादारांची “बार्गेनिंग पॉवर” म्हणतात
- तुमच्या प्रॉडक्टसारखी प्रॉडक्ट बनवणारे नवीन उत्पादक बाजारात येऊ शकतात. याला “थ्रीट फ्रॉम न्यू सप्लायर” म्हणतात
- तुमच्या ग्राहकाची (व्यक्ती किंवा कंपनी) स्वतःची सौदेबाजी करण्याची क्षमता असते. याला ग्राहकांची “बार्गेनिंग पॉवर” म्हणतात.
सगळ्या घटकांचे प्रमाण जर जास्त असेल तर तो उद्योग अत्यंत चढाओढीचा / स्पर्धात्मक असेल. घटकांचे प्रमाण जर कमी असेल तर तुमचा उद्योग नवीन आहे किंवा वेगळा आहे. जे एकप्रकारे चांगले असेल. छोट्या उद्योगांच्या काही समस्या आहेत, तर दुसरीकडे प्रगतीच्या संधी आणि मदतीच्या संधीही उपलब्ध आहेत. त्या जाणून घेणे महत्त्वाचे आहे. अनेक वित्त पुरवठा (इन्व्हेस्टर) करणारे, स्टार्टअप्स/छोट्या उद्योगांना तंत्रज्ञान किंवा भांडवल पुरवण्याच्या संधी निर्माण करतात. किंवा त्यांच्यात एक दुवा निर्माण करून देतात. भारत सरकार सुद्धा लघुउद्योगांना चालना देण्यासाठी प्रयत्नशील आहे.
मागच्या वर्षी अमरावतीला गेलो तेव्हा "झेपकॅब" नावाची टॅक्सीसर्विसचा वापर केला. अगदी ओला-उबेरच्या धर्तीवर किंवा त्यांच्या तोडीची सर्विस. मुख्य म्हणजे ही कंपनी अमरावतीच्या एका युवा उद्योजकाने सुरू केली आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत.
आज देशातील उद्योजकांत एक नवीन आत्मविश्वास निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात उद्योगांना बाळ देणारे सरकार आहे. केंद्राच्या आणि राज्याच्या अनेक योजना आहेत. सोबतीला खासगी संस्था, पतसंस्था,बॅंका आणि गुंतवणूकदार उपलब्ध आहेत. तेव्हा उद्योग जगताला पोषक असे वातावरण आहे. बाजारपेठ मानसिकतेतून उत्पादन करण्याच्या मानसिकतेकडे वळण्याची ही एक मोठी संधी आहे, आणि हीच ती वेळ.
विदर्भातील नेतेमंडळी विभागाला सक्षम करण्यासाठी यथोचित कामगिरी करीत आहेत गरज आहे इथल्या उद्योजकांनी त्यांच्या या प्रयत्नांना साद देऊन जोखीम पत्करून जोमाने नवीन आणि मोठे उद्योग सुरू करण्याची.'बडा है तो बेहतर है' या ब्रीदवाक्याला धरून विदर्भाला उत्तरप्रदेशातील नोएडा किंवा हरयाणातील गुरुग्राम सारखे उद्योगीत करण्याची.
नीट अभ्यास करा, ठरवा, मार्गदर्शकांना भेटा, योग्य पावले उचला. यश आपलेच आहे!
कुठल्याही क्षेत्रात नवीन उद्योग उघडण्याचे असेल तर याविषयक शास्त्रोक्त मार्केट रिसर्च करून मिळेल. अधिक माहितीसाठी संपर्क करा dhan1011@gmail.com
- धनंजय मधुकर देशमुख, मुंबई
(लेखक, स्वतंत्र मार्केट रिसर्च विश्लेषक आहे. पोस्टमधील माहिती, आकडेवारी, कविता, फोटो इंटरनेट वरुन साभार घेतले आहे.)
उत्तम.
ReplyDelete