८ एप्रिल २०२२, मुंबई
एक अधिक शून्य..
- धनंजय देशमुख
एक अधिक शून्य..
- धनंजय देशमुख
एक अधिक शून्य म्हंटले की सर्वप्रथम काय येते डोक्यात? एक, दहा, काहीच नाही?
उद्योग जगतात, एक-अधिक- शून्याच्या अनेक गोष्टी घडतात. "एक" म्हणजे प्रस्थापित उद्योग, "शून्य" म्हणजे प्रस्थापित नसलेले किंवा तोट्यात असलेले उद्योग.
अनेकदा आपण बघतो, फायद्यात असलेली विमान कंपनी, इ-कॉमर्स कंपनी तोट्यात असलेल्या कंपनिला विकत घेते किंवा त्यांच्या सोबत भागीदारी करते.
काय साध्य होत असेल? कधी(कधी, "स्केल ऑफ इकनॉमिक्स" म्हणता येईल, किंवा एकमेकांच्या पूरक गोष्टी ज्यामुळे ग्राहक, व्यवसाय वाढतो, खर्च काही प्रमाणात कमी होतो. मुख्य म्हणजे स्पर्धात्मक खर्च कमी होतो. म्हणजे शेवटी फायदाच वाढतो, किंवा नुकसान कमी होतो.
त्यामुळे उद्योगक्षेत्रात अनेकदा "एक अधिक शून्य" हा सव्वा सुद्धा होऊ शकतो!
सिनेक्षेत्रात आधी सिंगल स्टारर सिनेमे यायचे पण नंतर नंतर दोन अभिनेते असलेले आणि नंतर मल्टी स्टारर सिनेमे यायचे. अर्थात सगळेच यशस्वी व्हायचे असे नाही.
राजकिय अन्वयार्थ..
राजकारण हे वेगळया धाटणीचे क्षेत्र आहे. इथे ग्राहक पाच वर्षांतून एकदा आणावा लागतो. पण तो अत्यंत वेगवेगळया गटांत विभागलेला असतो - धर्म, जात, पंथ, भाषा, प्रांत, राहणीमान आणि इतर अनेक बाबी.
त्यामुळे राजकारणात प्रत्येक गटासाठी एक असे राजकारणी, नेते आणि पक्ष आढळून येतात. त्यातील कुणी एकच जिंकतो, पण त्यामागे समन्वय, एकमेकांच्या पूरक किंवा घातक गोष्टींचा विचार केला जातो. पडद्याच्या मागे बर्याच हालचाली होत असतात.
राजकारणी तसे हुशार असतात - कधी-कधी ते दिवसाच्या स्पष्ट उजेडात आघाड्या किंवा युती करतात. सुकर पद्धतीने जिंकणे हे प्रमुख कारण असले तरीही युतीचे फायदे म्हणजे, जागावाटप झाल्यानंतर तुम्ही आपआपल्या भागांवर लक्ष केंद्रित करू शकतात. साधन-संसाधनाचा वापर विभागला जातो, खर्च आटोक्यात येतो. मुख्य म्हणजे एकाच विभागात दोन पक्ष सोबत असल्याने कार्यकर्ते वाढतात. सर्वात महत्वाचे म्हणजे सर्वच भागात पक्षाला नवनवीन आणि चांगले उमेदवार शोधण्याची गरज भासत नाही.
अर्थात या झाल्या सकारत्मक बाबी. काही नकारात्मक बाबी पण असतात. उमेदवारी मिळाली नाही म्हणून बंडखोरी वाढते, कार्यकर्ता छुप्या पद्धतीने विभागाला जातो, आणि बर्याचदा आपल्याच मित्रपक्षाचा उमेदवार पाडापाडीचे डाव रंगतात. मागच्या अडीच तीन वर्षात महाराष्ट्रात - लोकसभा असेल की विधानसभा निवडणूक असेल, अनेक ठिकाणी हा खेळ झाला आहे. अनेक मातब्बर उमेदवार पडले.
असो.
तेव्हा राजकारणात "एक अधिक" एक होतोच असे नाही. एक, अकरा, अर्धा किंवा शून्य पण होऊ शकतो. काहीही होऊ शकते.
आगामी काळात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होईल. त्याअनुषंगाने विविध राजकिय पक्षांनी आपापले कार्यक्रम आखायला सुरुवात केली आहे.
मराठी मतदाताला जागृत ठेवण्यासाठी आणि राजकिय पक्षांकडून मराठी अस्मितेच्या भूलथापांना बळी ना पडण्यासाठी भाजप बर्याच महिन्यांपासून "मराठी कट्टा" हा कार्यक्रम यशस्वीरित्या राबवत आहे.
दुसरीकडे महाविकासआघाडी त्यांना राज्यात असलेल्या पाशवि बहुमताचा विचार करून, आणि पूरक असलेल्या एकमेकांच्या वोटबँकेचा पुरेपूर लाभ मिळेल या भावनेतून एकत्र येऊन लढण्याचा विचार करत असेल.
तिसरीकडे, मनसे, AIMIM, वंचित बहुजन (सोबतीला राजद आणि IUML) यांसारखे "सिंगल थीम-बेस्ड" पक्ष आपापल्या परीने आपले अस्तित्व दाखवून द्यायचा प्रयत्न करीत आहे, जेणे करून त्यांना प्रीपेड (म्हणजे निवडणूक आधीची युती) रीचार्ज मिळावा.
आजमितीला या पक्षांचे निवडून आलेले सदस्य संख्या शून्य किंवा एक / दोन असली तरीही त्यांचा ठराविक मतदार आहे हे विसरता कामा नये. आपल्या मतदारांना एकसंध बांधून ठेवण्यात हे तितकेसे यशस्वी होत नसतील, पण तरीही यांच्या कडील संख्या शहरातील अनेक ठिकाणी "गेम" खराब करू शकतात हे मात्र खरे.
मागच्या काही महिन्यांत मनसे ही हिंदुत्वाचा मुद्दा धरून वर येण्याचा प्रयत्न करीत आहे. भाजप सोबतची युती तोडून महाविकास स्थापन करून सत्ता मिळविली म्हणून शिवसेनेचा मतदार आपल्याकडे वळू शकतो, या अपेक्षेने मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेतलाय असे म्हणायला वाव आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
चैत्रपाडवा रॅली मध्ये ते मुख्यत्वे हिंदुत्व मुद्द्याला धरून बोलले. भोंगा, मदरसा, सुरक्षा हा विषय पुन्हा एकदा आणला. एका प्रकारे भाजपला अनुकूल असलेल्या बाबी ते बोलले. तरुण वर्गाला पुन्हा एकदा आठवण करून दिली. आता हा प्रकार भाजपच्या जवळ जाण्यासाठी आहे की अजून काही हे काही दिवसात दिसेल.
दुसरा विचार केला तर त्यांना ऐकणारे कोण होते? जमलेले सगळेच मनसे कार्यकर्ते, मतदाता होते हे मानणे अतिशयोक्ती होऊ शकते. त्यात अनेक अराजकिय लोक असतिल. अनेक भाजप, सेना, राष्ट्रवादी, कॉन्ग्रेस च्या कट्ट्यावर जाणारे असतिल, तळ्यात-मळ्यात किंवा फेंस सिटर असतिल. मात्र
हीच मंडळी निवडणुकीच्या काळात धावपळ करते.
थोडक्यात, राज ठाकरे यांनी तळ्यातून गाळ काढण्याचे संकेत दिले आहे. गाळ निघाल्या नंतर उरलेल्या पाण्याचा वापर कुणाला करायला मिळेल (?), तो करायचा की नाही हा विचार काही करतील अशी अपेक्षा.
भाजप ठाम..
हिंदुत्व मुद्द्यावर भाजप ठाम असल्याने मोठय़ा प्रमाणात त्यांचा मतदाता पक्का आहे. शिवसेनेच्या "महाविकास" प्रयोगामुळे प्रखर हिंदुत्वाची कास धरणारे मतदाता त्यांच्यापासून लांब गेला जाण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे मनसे ने हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरलाय. त्याअनुषंगाने कधी काळी भाजपला ते अनुकूल होतील का? मागच्या वर्षी विरोधीपक्ष नेते यांचे या विषयक एक वक्तव्य सूचक आहे, ते म्हणाले होते, "आमचे (भाजपचे) हिन्दुत्व व्यापक आहे (म्हणजे त्यात भाषा किंवा प्रांतवाद नाही)". मनसे ही अमराठी लोकांच्या विरोधात असते असे एक चित्र आहे. मात्र मशिदींवर लावलेल्या लाऊडस्पिकर विषयी भूमिका ठेवून मनसे "आम्ही प्रखर हिंदुत्वाची कास धरतोय" हे चित्र जनमानसात तयार करतेय का? (खरे तर मुंबई भाजपने २९ मार्च २०२२ ला मुंबई पोलीस आयुक्तांना औपचारिकरित्या निवेदन देऊन भोंगे विषयी आपली भूमिका आधीच स्पष्ट केली आहे.) पण मनसेला व्यापकता आणावी लागेल. त्या अनुशंगाने मुंबई आणि राज्यातील अमराठी जनतेला जोड़ने, जवळ करणे आले. काही बातम्या अश्या होत्या की आगामी काळात मनसे प्रमुख अयोध्येला जाणार. तिकडे गेल्यावर साधू संतांच्या सोबतीने ते "अमराठी हिंदू सुद्धा आमचे बांधवच, आम्ही त्यांच्यासाठी पण लढणार" असा संदेश देण्याचा प्रयत्न करतील का?
एकदा हे झाले की मग त्यांचे हिन्दुत्व "व्यापक हिन्दुत्वच्या" अधिक जवळ जाईल! एक मात्र खरे, गेल्या काही दिवसांतील घडामोडींचा विचार केला तर, शिवसेना "ज्वलंत हिंदुत्वा" पासून लांब जातेय हे जनमानसात पोहोचण्यात मनसे काही अंशी यशस्वी होताना दिसतेय.
या सगळ्या घडामोडींचा विचार केला तर, शिवसेनेमधील काही नेत्यांमध्ये किंवा कार्यकर्त्यां मध्ये चलबिचल होईल? ज्यामुळे भाजपची जवळीक साधायचे प्रयत्न होतील, किंवा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मदत करण्याचा प्रयत्न केला जाईल?
जसजशी मनसे हिंदुत्वमुद्दा प्रखरपणे पुढे करेल (विशेषत भोंगा विषयक) तसतसे मनसेतील काही कार्यकर्ते/नेते दुरावतील, परंतु नवीन सुद्धा जोडले जातील यात शंका नाही.
महाराष्ट्राच्या निवडणुकीचा विचार केला तर भाजप आजघडीला राज्यात स्वबळावर जिंकून येण्यास सक्षम वाटते. मात्र मुंबई महानगरपालिकेत स्वबळावर जिंकायचे प्रयत्न प्रामाणिक असले तरीही, ते तितके सोपे जाणार नाही हे सुद्धा तितकेच खरे.
मुंबईमध्ये निवडणुकीत जाती पेक्षा भाषिक आणि साम्प्रदायिक मतपेटी जास्त प्रभाव टाकते. त्यामुळे, तीन पक्षांच्या आघाडीमुळे काही ठिकाणी समीकरणे अवघड होऊ शकतात. अर्थात राजकारणात एकाला आपल्या जवळ ना करता दुसर्याला कमी करण्याचे प्रकार सर्रासपणे चालतात.
तेव्हा, संख्येचा विचार केला तर भाजप आज जर "एक" असेल तर त्यांना मनसेचा "शून्य" काही मदत करू शकेल का? एक अधिक शून्य सव्वा होईल का (125)? विशेषतः दक्षिण मुंबई आणि पूर्वी उपनगरांमध्ये?
यासाठी साधे सरळ उत्तर कुणीच देऊ शकत नाही, परंतु मतदारांच्या दृष्टिकोनातून बघितले तर, बरेच "फेंस सीटर" हे मनसेच्या नवीन रूपाला भाळून त्यांना मतदान करू शकतात. हा मतदाता भाजपचा पारंपारिक मतदाता नसून, तो शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस वर नाराज असलेला मतदाता असू शकतो. ह्यांचे प्रमाण प्रत्येक बूथ प्रमाणे वेगळे असेल त्यामुळे ज्यांना याचा फायदा घ्यायचा असेल त्यांना बूथ लेवल वर नीट कार्यक्रम राबवावा लागेल. जोडीला बंडखोरी किंवा नाराजी मुळे प्रत्येक भागात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मते फुटतात, मात्र कुणाचे किती फुटतील याचा अंदाज उमेदवार जाहीर झाल्यानंतर नीट बांधता येईल.
भाजप ही निवडणूक स्वतःच्या ताकदीवर लढेल यात शंकाच नाही. तीन दशकाची "अॅण्टी इन्कमबंसी", भ्रष्टाचार, घराणेशाही, मुंबईकरांच्या अपेक्षा हे मुद्दे भाजपला अनुकूल आहेतच. हिन्दुत्व, मोदी, फडणवीस यांना बघून मतदान करणारा एक मोठा वर्ग उच्च इमारतीत राहतो. भाजपला विजयश्री खेचून आणण्यासाठी मतदानाचा टक्का वाढवावा लागेल, पण तो विशेषकरून उच्च इमारती मध्ये राहणार्या वर्गातच!
कुणाच्या कुबड्या घेऊन आपला संसार थाटावा अशी मानसिकता आजघडीला भाजप मध्ये नक्कीच नाही, मात्र "साम-दाम-दंड-भेद" याचा योग्य वापर करून त्यांना अपेक्षित ते साध्य करता येऊ शकते.
शून्य म्हणा की पायली, जोडून तोटा होणार नाही याची काळजी घेतली तर फायदाच होणार.
जाता जाता..
मनसेने व्यापक हिंदुत्वाचा मुद्दा घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे नेहमी "मराठी माणसाच्या" मुद्द्यावर लढणारे पक्ष विचारात पडले असतिल. मराठी अस्मिता, मराठी माणूस या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करून आपण स्वतःला कोंडून ठेवावे की विकास, हिंदुत्वाचा विचार करावा या द्विधा मनस्थितीत अनेक असतिल.
अल्पसंख्यांक वोट बँककडे लक्ष केंद्रित करून मनसेच्या नवीन रूपाकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते का हा विचार सुद्धा अनेकांच्या डोक्यात घुटमळत असेल.
एक मात्र नक्की, जितकी मनसे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेईल, तितके जास्त (भाजपला सोडून) इतर पक्षांची अल्पसंख्यक वोट बँकेवर भिस्त वाढेल. अर्थात त्यात जोखीम आहे, शिवाय तिकड़म साधून गैर भाजप महापौर बसला तरीही, एखाद्याला हातातले किती सोडावे लागणार ही सुद्धा धास्ती राहणार!
दुसरीकडे पूर्व मुख्यमंत्री आणि आताचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई, मराठी आणि महाराष्ट्र हे कुण्या एका पक्षाची, कुटुंबाची ओळख नाही, अस्मिता नाही, हे विधिमंडळात आक्रमकपणे ठणकावून सांगितले, त्यामुळे भाजप आता प्रत्येक राजकिय संघर्षाला आक्रमकपणे सामोरे जाईल यात शंकाच नाही.
कुणासोबत आघाडी, युती किंवा समन्वय करावा हे पक्ष नेतृत्व ठरवतो - काही व्यक्तींची किंवा एखाद्या पक्षाची लोकप्रियता आणि कार्यक्रम बघून (एखाद्या पक्षाचा नेता अमुक वाजता उठतो यावर ही समीकरणे जुळत नाही).
कार्यकर्ता हा केंद्रबिंदू असला तरीही त्यांच्या भावनिक प्रतिक्रिया बाजूला ठेवाव्या लागतात, कारण पक्ष हा निर्विकार / स्थितप्रज्ञ वृत्तीने चालवला जातो.
क्रिकेट मध्ये सुद्धा कधी-कधी नऊ/ दहा नंबरच्या खेळाडूला सुद्धा सोबत घेऊन, स्ट्राइक रोटेट करुन सलामीवीर शतक ठोकतो, सामना जिंकवून देतो.
नीट बघितले तर कुठल्या तरी एखाद्या मोठ्या राजकिय पक्षाला फायदा करून देण्याची सुवर्णसंधी मनसेला आहे (त्यांचा फायदा होईलच). अर्थात त्यासाठी आधी मुंबई महानगरपालिकेत आपले कर्तुत्व सिद्ध करावे लागेल म्हणजे पुढील विधानसभा निवडणुकीत पुनरागमन करण्याची संधी आपसूकच निर्माण होते.
आजघडीला मनसे भाजपाला अनुकूल असल्याचे संकेत देत आहे.
मात्र, दोन वर्षांंपूर्वी मनसेची भूमिका भाजप विरोधी होती. पण राजकिय क्षेत्रात हा काळ खूप मोठा असतो. दुसरे, निवडणुकीच्या काळात सामान्य (पारंपरिक किंवा शिक्षित नाही) मतदाताच्या डोक्यात जे वारंवार बिंबवले जाते किंवा जे नावीन्यपूर्ण पूर्ण असते ते ताजे राहते, त्यावर कुणाला मत द्यावे त्यांचे ठरते. दरवेळेस ते मागचा ट्रॅक रेकॉर्ड (हा किती खरा, खोटा) काढून ठरवतात असे नाही (आणि तसेच असेल अनेक राजकारणी घरी बसतील) अर्थात अश्या मतदातांची संख्या किती होऊ शकते हे आत्ता सांगणे कठीण आहे.
तेव्हा, मनसेच्या इंजिन मध्ये चांगल्या प्रतीचा कोळसा आणि मुबलक पाणी कुठून येते हे येणार्या काळात कळेलच. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसे कुणासोबत आणि कशी जाते हे बघणे औत्सुकतेचे ठरेल.
Stay Cool for witnessing Hot Actions.
जय हो.
(या लेखाद्वारे मुंबई भाजपने मनसे सोबत युती करावी असे कुठेही सुचविलेले नाही याची कृपया नोंद घ्यावी.)
- धनंजय मधुकर देशमुख, मुंबई
(स्तंभलेखक एक स्वतंत्र मार्केट रिसर्च विश्लेषक आहे. पोस्टमधील माहिती, आकडेवारी, कविता, फोटो इंटरनेट वरुन साभार घेतले आहे.)
Comments
Post a Comment