14 नोव्हेंबर 20, मुंबई
तिमिरातूनी तेजाकडे..
आज कार्तिक अमावस्या. अशी मान्यता आहे की अमावस्याची तिथि देवी श्रीमहालक्ष्मी यांना प्रिय आहे. ब्रह्मपुराणानुसार आज श्रीमहालक्ष्मी देवी पृथ्वीतलावर येतात. महाभारतात शांतीपर्वात भगवान श्रीकृष्णाने कार्तिक अमावस्याबाबतीत वचन दिले होते. याच दिवशी चौदा वर्षांचा वनवास भोगून, रावणाचा नाश करून प्रभु श्रीराम अयोध्येला परतले होते. त्यांच्या स्वागतासाठी लक्ष लक्ष दीप प्रज्वलन करून सगळीकडे रोषणाई करण्यात आली होती. आस्था अशीही आहे की पितृपक्षात धरातलावर आलेले पितृगणांना, पितृलोकात परतायला त्रास होऊ नये म्हणून दिवे लावणी केली जाते. तेव्हा कार्तिक अमावस्या ही एक महत्वपूर्ण तिथि आहे.
तिमिरातूनी तेजाकडे..
आज कार्तिक अमावस्या. अशी मान्यता आहे की अमावस्याची तिथि देवी श्रीमहालक्ष्मी यांना प्रिय आहे. ब्रह्मपुराणानुसार आज श्रीमहालक्ष्मी देवी पृथ्वीतलावर येतात. महाभारतात शांतीपर्वात भगवान श्रीकृष्णाने कार्तिक अमावस्याबाबतीत वचन दिले होते. याच दिवशी चौदा वर्षांचा वनवास भोगून, रावणाचा नाश करून प्रभु श्रीराम अयोध्येला परतले होते. त्यांच्या स्वागतासाठी लक्ष लक्ष दीप प्रज्वलन करून सगळीकडे रोषणाई करण्यात आली होती. आस्था अशीही आहे की पितृपक्षात धरातलावर आलेले पितृगणांना, पितृलोकात परतायला त्रास होऊ नये म्हणून दिवे लावणी केली जाते. तेव्हा कार्तिक अमावस्या ही एक महत्वपूर्ण तिथि आहे.
आपण या तिथीला रात्री श्रीलक्ष्मीपूजन करतो, आणि दिवे लावतो. एकाप्रकारे अमावस्येला असलेला दाट अंधार, दिव्यांच्या पवित्र अग्निमुळे दूर होतो.
ॐ असतो मा सद्गमय ।
तमसो मा ज्योतिर्गमय ।
थोडक्यात, अन्धकारातुन प्रकाशकडे , तिमीराकडुन तेजाकडे असा हा प्रवास आहे, पर्व आहे. दीपोत्सवाच्या पवित्र तेजाने दुःख, अज्ञान, दारिद्र्य, रोग तडीस जाऊन सुख, ज्ञान, संपत्ति आणि आरोग्य संपादन होते.
कवि शंकर रमाणी यांच्या "दिवे लागले रे" या कवितेतून काही ओळी आठवल्या..
"दिवे लागले रे, दिवे लागले रे,
तमाच्या तळाशी दिवे लागले;
दिठीच्या दिशा खोल तेजाळतांना
कुणी जागले रे? कुणी जागले?"
(तम म्हणजे अंधकार, दिठी म्हणजे दृष्टि).
समाजकारण करणार्यांनी विचार करायला हवा, कवि म्हणतात त्याप्रमाणे तेज प्रकाश झाल्यानंतर दहा दिशा बघतांना निर्धन, दुःखी लोकांकडे कुणी खरेच लक्ष दिले का?
अज्ञान ही संधीच..
समाजकारण ते राजकारण असा प्रवास करणारे अनेक आहेत. यातील बहुतांशी महानुभाव सामान्य जनतेच्या भावनेचा अत्यंत धूर्तपणे वापर करतात. राज्य, धर्म, जात, भाषा याबाबतीत त्यांच्या कल्पना, परिभाषा कधी कधी सीमित असू असतात. नेमका याचा सीमिततेचा वापर काही मंडळी करतात. त्याला चाणाक्षपणा म्हणणे म्हणजे मारणाऱ्याला संत म्हणण्यासारखे आहे.
अस्मिता..
अस्मिता या शब्दाचा ढोबळ अर्थ, अस्तित्व आणि ओळख असा आहे. "रंग माझा वेगळा" या नियमाने अनेकांना आपली ओळख "विशिष्ट" आहे असा गैरसमज होतो, किंवा तसा करण्याचा प्रयत्न होतो, आणि मग कधी ती "ओळख" अभिमान ते अहंकार असा प्रवास करते हे त्यांच्याही ध्यानी येत नाही. थोडक्यात अस्मिता वि षय खोल आहे. बात आखिर "पहचान" की है.
मराठी अस्मिता किंवा महाराष्ट्राची अस्मिता हा सामायिक मुद्दा आहे, म्हणून तो कुठल्या एका गटाचा किंवा संघटनेचा असूच शकत नाही. याला तार्किक आणि मुद्देसूद बांधणी घडवून हाताळायला हवा.
खेळ अविरत सुरूच आहे..
"अस्मिता" हा मुद्दा बनवून त्याचा वापर आपल्या सोयीनुसार करणे हा खेळ राजकारणात अनेक दशकांपासून सुरू आहे. आता त्याचे मापदंड अधिक कडक आणि कठीण होतात आहे एवढेच. कधी भाषिक अस्मिता (मराठी, अमराठी), किंवा राज्याची अस्मिता (महाराष्ट्र, महाराष्ट्रएतर) जागृत करण्याचे प्रयत्न केले जातात. ओंगळवाणे वाटत असले तरीही हा हुकमी एक्का बर्याचदा समोरच्याला गारद करतो.
गम्मत अशी आहे, अस्मितेचा मुद्दा हा दोन राजकिय पक्षांत असतो हा गैरसमज आहे. एकाच पक्षात सुद्धा हा मुद्दा सुप्तपणे लपला असतो.
कान कुणी टोचावे?
आजकाल कान टोचणी कुठेही होऊ शकते, अगदी डॉक्टर सुद्धा करतात. पण परंपरेने कान टोचणी हे सोनार करायचे, आणि म्हणुनच असे म्हणतात "कान टोचावे ते सोनारानेच".
"अस्मिता" या भावनिक ब्रह्मास्त्राच्या हल्ल्यात पासून जर शाबूत रहायचे असेल तर जनजागृती करणे आवश्यक आहे. पूर्वी हे कार्य संत, समाजसुधारक (जसे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ) करायचे. कालांतराने संतसमाजाचा पद्धतशीरपणे खच्चीकरण करण्याचा डाव सुरू झाला. उद्दिष्ट एकच, जनता सुजाण झाली तर मग आपला गाडा कसा हाकणार?
मुम्बई मेरी भी है..
मुंबई प्रभाग हा अगदी पाषाणयुगापासून (स्टोनएज) अस्तित्वात होता, कालांतराने अनेक राजघराण्यांनी इथे राज्य केले. नजीकच्या काळात म्हणजे तेराव्या शतकात राजा भीमदेव यांनी शहराचे पुनर्वसन केले असे म्हंटले जाते. त्याच काळापासून येथे स्थानिक आणि प्रवासी असा पायंडा पाडला गेला. आजतागायत तो तसाच आहे.
राजकिय डाव साधण्यासाठी आजही "मुम्बई कुणाची" यावरून वादांचे आगडोंब उधळले जातात. ज्या क्षणाला "मुंबई मेरी भी है" असा आवाज येतो त्याचक्षणी बहुतांश मराठी भाषिक चेकाळून उठतो, आणि इथेच काही राजकारण्यांचे फावते. त्यांना हेच अपेक्षित असते. शहराच्या संमिश्र समाजात भाषिक तुरटी टाकून मराठी, अमराठी असा वाद पेटवला की सगळे काही त्यांच्या मनासारखे होते.
याची पुढची पायरी म्हणजे महाराष्ट्र धर्म किंवा महाराष्ट्राची अस्मिता. आपल्याला पटले नाही असे कुणी काही केले तर लगेच त्याला महाराष्ट्राच्या अस्मितेशी जोडून महाराष्ट्रद्रोही ठरवून मोकळे होतात.
भारत देश हा बहुभाषिक संस्कृतींचा संग्रह आहे, एक सुंदर मिलाफ आहे. महाराष्ट्रा सुद्धा विविध धर्म, कुळ, जात, वंश यांचा संग्रह होता. समर्थ रामदासांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील "निश्चयाचा महामेरू " या काव्यरचनेत महाराष्ट्र धर्माचा उल्लेख केला आहे. महाराजांनी तो कसा सुरक्षित ठेवून वाढवला याचे सुंदर वर्णन केले आहे -
"देव धर्म गोब्राम्हण, करावया संरक्षण
हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली
या भूमंडळाचे ठायी, धर्मरक्षी ऐसा नाही
महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणे".
कालांतराने महाराजांच्या या शिकवणी बद्दल मते-मतांतरे झाले असतिल. आज आपण "महाराष्ट्रधर्म" काय आहे याबद्दल अनेक परिभाषा बघतो. त्यातील काही जनतेच्या मनात रुजल्या, काही योग्य रीतीने रुजवील्या जातात तर काही पद्धतशीरपणे लादल्या जातात.
हे आहेत मराठी अस्मितेचे खरे कैवारी?
भाषिक किंवा भौगोलिक कारणांचा वापर करून आपले तारू हाकायचे हा प्रकार राजकारणी मंडळी करतात. पण बर्याचदा कलाकार मंडळी त्यांच्या पायाशी लोळण घेऊन त्यांच्या संकुचित विचाराला समर्थन करतात. हीच मंडळी अमराठी गाण्यांची मैफल किंवा त्यांच्यावर नृत्य सादर करण्यात धन्यता मानतात. तेव्हा कुठे जाते मराठी अस्मिता? मुंबई मध्ये मराठी अस्मितेचे शंख फोडणारे महानुभाव मुंबई इंडियन या क्रिकेट टीम चा पुरस्कार करतात. त्यांच्याच भाषेत विचारल्याचे झाले तर, किती मराठी खेळाडू किंवा महाराष्ट्रियन खेळाडू या टीम मध्ये आहेत? साध्या मुंबईच्या रणजी टीममध्ये किती मराठी खेळाडू आहेत? कोण आहे कप्तान?
जाता जाता..
मराठी अस्मिता हा विचार आहे, ती ओळख आहे, ती प्रत्येक मराठी जनाच्या मनात सुप्त आहे. आपल्याला पाहिजे तेव्हा भावनिक साद देऊन अस्मितेला हात घालण्याचा अगोचरपणा करणाऱ्यांना जनतेने समज देण्याची गरज आहे. मग ते कुणीही असो.
सामान्य जनतेला परिस्थितीचा सारासार विचार करून निर्णय घेण्याची सवय कशी होईल, त्यासाठी कशी जनजागृती केली जावी याचा विचार व्हायला हवा. मराठी अस्मिता, महाराष्ट्र धर्म काय आहे याचे विवेचन संबंधित मंडळीनी केले तर त्याचे चांगले परिणाम होऊ शकतात. मात्र टिंगल टवाळी होऊ नए याची काळजी घेतली तर त्याचे चांगले परिणाम मिळतील. शेवटी कान सोनारानेच टोचले तर जास्त चांगले परिणाम साध्य केले जाऊ शकतात. "मुंबई मेरी भी है" असा आकांडतांडव केला तर "शेठ सांभाळून" असे ऐकावेच लागेल. उगाच आक्रस्ताळेपणा वाढतो आणि शेवटी परिणाम तोच - ज्याला मराठी /अमराठी असे "भागायचे" आहे तो यशस्वी होतो. आपल्याला जर मराठी आणि अमराठीचा गुणाकार साधायचा असेल तर तसे प्रयत्न शांत डोक्याने आणि सुसंबद्ध पद्धतीने व्हायला हवेत
ट्विटर सारख्या सोशल मीडिया वर मराठी अस्मितेबद्दल पाहिजे तशी बडबड करून, ब्लूटिक मिळवून किंवा टीव्ही वरती फुटेज खाऊन स्वतःचे प्रस्थ वाढवीणार्या मंडळीपासून राजकिय पक्षांनी दूरी राखली तर त्यांचे भलेच होईल (नाहीतरी छपास आणि दिखासपासून लांब राहण्याचे मार्गदर्शन आहेच). नाहीतर "भीक नको पण कुत्रं आवर" असे ऐकण्याची वेळ येते. जेव्हा दोन नायकांमध्ये तुंबळ हाणामारी होते तेव्हा शेवटचा गुद्दा कोण हाणतो हेच प्रेक्षकांच्या लक्षात राहते.
मुम्बई, महाराष्ट्र हे भारतीयांचे आहे. याला भाषिक किंवा भौगोलिक मुद्दा बनवून जनतेच्या मनात द्वेषाचा अंधकार निर्मित करण्याचा प्रयत्न होत असतो.
आशा करूया या पवित्र दिपोत्सवाचा प्रकाश आणि ऊर्जा, समाजातील अंधकार आणि जळमटे साफ़ करण्यास मदत करतील.
दिवाळी आहे, परंतु सोबतीला कोरोना सुद्धा आहेच हे ध्यानात ठेवूया. तेव्हा मास्क, सोशल डिसटंसिंग, वारंवार हात धुणे गरजेचे आहे. गरज असेलतरच बाहेर पडा. पाश्चात्य देशांत दूसरी लाट आलेली आहे. दिल्लीतही आकडे पुन्हा वाढत आहेत. यंदा दिवाळीभेटी ऑनलाईन पद्धतीने करून बघुया.
आपणास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
"सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना
तिमिरातूनी तेजाकडे प्रभू आमुच्या ने जीवना".
-धनंजय देशमुख
(लेखक एक स्वतंत्र मार्केट रिसर्च विश्लेषक आहे. वरील पोस्टसाठी लागणारी माहिती (फोटो, आकड़े, कविता) इंटरटनेट वरुन साभार गोळा करण्यात आली .)
तिमिरातूनी तेजाकडे प्रभू आमुच्या ने जीवना".
-धनंजय देशमुख
(लेखक एक स्वतंत्र मार्केट रिसर्च विश्लेषक आहे. वरील पोस्टसाठी लागणारी माहिती (फोटो, आकड़े, कविता) इंटरटनेट वरुन साभार गोळा करण्यात आली .)
Comments
Post a Comment