4 नोव्हेंबर 2020, मुंबई
लांबलेले सीमोल्लंघन..
दसरा म्हंटले की सीमोल्लंघन आलेच. वीसेक वर्षांपूर्वी (आताही बर्याचशा भागात) बहुतांश हिंदू पुरुष, संध्याकाळच्या वेळेला आपापल्या राहत्या घराबाहेर पडून गावाच्या सीमेवरील मंदिरात जायचे, प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊन घरी परतायचे. एका प्रकारे ते सीमोल्लंघन व्हायचे.आजकालच्या शहरी जीवन पद्धतीमुळे ही प्रथा कदाचित थोड्याफार प्रमाणात कमी झाली असावी. त्याला आता आंतरिक स्वरूप जास्त आले आहे - "आपल्यातील "स्वत्व" च्या सीमा तोडून, चांगली व्यक्ति व्हा" याला आता सीमोल्लंघन चे स्वरुप आले आहे. असो.
भ्रमनिरास?
महाराष्ट्राच्या राजकिय नेत्यांसाठी या वेळचा दसरा, सीमोल्लंघन महत्वाचा ठरणार असे चित्र निर्माण झाले होते. पुढेमागे होईलही. पण दसऱ्याच्या एक दिवस आधी बातमी धडकली - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून आपल्याला कोरोना झाल्याचे सांगितले.
15 मार्च ला केंद्र सरकारने देशात कोरोना महामारी सुरू झाली आहे हे जाहीर केले. गुढी पाडव्या (25 मार्च) पासून पहिला लॉकडाऊन सुरू झाला. तेव्हापासुन तर 24 ऑक्टोबर पर्यंत देवेन्द्र फडणवीस सतत कार्यशील होते.
अभ्यास आणि सूचना..
जगामध्ये कोरोना कसा पसरला, कुठल्या देशामध्ये लवकर पसरला, विषाणूचे किती प्रकारचे "स्ट्रेन्स" आहेत, आणि कुठला घातक आहे याबद्दलची माहिती गोळा करून, त्याचे आकलन करून अभ्यास करणे गरजेचे होते. सुरुवातीच्या दिवसांत देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने माहिती देत होते त्यावरून हे गृहीत धरता येईल की नेहमी प्रमाणे त्यांनी या विषाणूचा सविस्तर अभ्यास केलेला होता. आरोग्यसेवा कशी विकेंद्रित (decentralise) व्हावी यासाठी त्यांनी केलेल्या सूचना महत्वाच्या होत्या. त्याच बरोबर बाजारसेवा सुद्धा विकेंद्रित करणे गरजेचे होते. जसे किराणा दुकान, अनेक ग्राहक, एका दुकानात गर्दी करण्यापेक्षा, दुकानदारांनी ग्राहकांकडे पोहोचणे गरजेचे होते.
लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर पोलीस, आरोग्य सेवा कर्मचारी आणि प्रशासनातील कर्मचार्यांना, ज्यांना आपण कोरोना योद्धा म्हणतो, त्यांना पुरेशी सुरक्षा मिळणे गरजेचे होते. पीपीइ किट, मास्क, ग्लोव्ज इत्यादी वस्तू मिळणे गरजेचे होते. एका पोलीस अधिकाऱ्याने फडणवीसांना त्यांची व्यथा सांगतानाचा विडिओ राज्याने बघितला.
दौरे दुणी दौरे..
यानंतर त्यांचे दौरे सुरू झाले. आधी मुंबई, पुणे, नागपूर पासून सुरुवात करत त्यांनी राज्याचा, जवळपास प्रत्येक जिल्हा पिंजून काढला. आरोग्य सेवेतील अधिकाऱ्यांशी, नागरिकांशी, व्यापाऱ्यांशी संवाद साधला, आरोग्य सुविधांची माहिती घेतली, उणीवा जाणुन घेतल्या, आणि मग शासनाला कधी खरमरीत, तर कधी सूचना तर कधी विनंतीवजा पत्र पाठविले. दरम्यानच्या काळात कोकणात निसर्ग नावाचे भयंकर चक्रीवादळ येऊन गेले. त्यानंतर राज्यभरात पूर परिस्थिती निर्माण झाली. शेवटी शेवटी, म्हणजे अगदी मागच्या महिन्यात परतीच्या पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यात शेतीचे अपरिमित हानी केली. फडणवीसांचे माहिती / संवाद दौरे सुरूच ही होते. सोबतीला कोरोना महामारीचा विषय सुद्धा होताच.
संवाद, अभ्यास, मुलाखती, संवाद...
लॉकडाऊनच्या काळात त्यांनी अनेक उद्योजकांशी, कलाकारांशी, समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींशी ऑनलाईन संवाद साधला. महाराष्ट्रातील अर्थव्यवस्था कशी पुन्हा गतिमान होईल यासाठी आपले विजन प्रस्तुत केले. दूर गेलेल्या माध्यमांनी त्यांच्या मुलाखती पुन्हा सुरू केल्या. राजकिय विषय बाजूला ठेवून राज्याची आरोग्य व्यवस्था आणि अर्थव्यवस्था कशी सुधारेल हे सांगण्यावर त्यांनी भर दिला. शासनासोबत पत्राद्वारे सुरू असलेल्या संवादाला, माध्यमांद्वारे सुद्धा संवाद साधण्याचा प्रयत्न केला. एका माहितीनुसार, मार्च पासून फडणवीसांनी शासनाला शंभरच्यावर पत्रे लिहिली. त्यांच्या किती पत्रांना उत्तर मिळाले हे मात्र गुलदस्त्यात आहे.
दसऱ्याआधीच सीमोल्लंघन...
ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पक्षश्रेष्ठींकडून देवेंद्र फडणवीसांना बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली. एका प्रकारे दसऱ्याच्या आधीच त्यांचे सीमोल्लंघन झाले. मात्र महाराष्ट्रात त्यांची गरज अधिक राहणार आहे हे येथील राजकिय अस्थिरतेकडे बघितल्यावर लक्षात येते.
नियती की राजकीय?
मागच्या वर्षी जर देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले असते तर त्यांचे राजकिय कद वाढले असते - राज्यातच नाही तर देशात. अगदी पक्षात सुद्धा. पक्षामध्ये पश्चिम भारतातील एक मोठे नेतृत्व म्हणुन त्यांचे नाव अधोरेखित झाले असते, कदाचित यामुळे पक्षीय राजकारणात उलथापालथही झाली असती. तेव्हा त्यांचे मुख्यमंत्री ना होणे हे नियतीचे विधान की राजकियसंधान हे येणारा काळच दाखवेल. मात्र, त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत सामील करून घेऊन काही दिशा निर्देश दिले गेले आहेतच.
राजकिय सीमोल्लंघन..
महाराष्ट्रातील राजकिय परिस्थिती गेल्या दहा महिन्यांपासून हवीतशी स्थिर नाही, उलट अस्थिर आहे हेच जाणवते. मध्यंतरी च्या काळात राज्यात "ऑपरेशन कमळ" अश्या वावड्या उठल्या होत्या - विशेषकरून मध्य प्रदेश आणि राजस्थान मध्ये जो राजकिय गदारोळ झाला त्यानंतर!
कोरोना...
या सगळया प्रवासात कोरोना व्हायची भीती होती. 24 ऑक्टोबर ला त्यांनी ट्विट करून त्याची माहिती दिली. "मला जर कोरोना झाला तर शासकीय रुग्णालयात दाखल करावे" हे त्यांनी आपल्या एका ज्येष्ठ सहकाऱ्याला सांगितले होते. "बोले तैसा चाले " याला जगत, आपल्याला कोरोना झाला आहे हे कळल्यावर त्यांनी शासकीय रुग्णालयात उपचार घेणे पसंत केले. काही दिवसांत त्यांना सुट्टी मिळेल आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे विश्रांती घेऊन ते परत महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेसाठी कार्यरत होतील यात शंका नाही.
भरपूर शिकविले कोरोना ने..
महामारी च्या काळात अनेक घटना घडल्या. उपचार व्यवस्थापन, पोलीस व्यवस्थापन, कर्मचारी वर्गाची सुरक्षा, कोविड केंद्रात रुग्णांची सुरक्षा, उपचार आणि औषधिसाठी रुग्णांची होणारी आर्थिक लूट आणि बर्याच गोष्टी. महत्वाची बाब आहे की, शहरी भागातील आरोग्य व्यवस्थेचे विकेंद्रीकरण होणे गरजेचे आहे. वॉर्ड स्तरावर, प्रत्येक वार्ड मध्ये, सरासरी दोन किलोमीटरच्या परिघात (रेडियस) किमान दोन मोठी उपचार केंद्रे असायला हवी (मुंबई मध्ये वॉर्ड सरासरी जनसंख्या एक लाख आहे). अत्याधुनिक यंत्र आणि टेस्टिंग यंत्रणा असलेली ही केंद्रे स्केलेबल (म्हणजे पाहिजे तेव्हा वाढवता येईल अशी) असावी. उपलब्धीत सोईसुविधानुसार यांना स्टार रेटिंग देता येईल. वॉर्डातील किमान 2-3 टक्के जनसंख्या एकाच वेळी उपचारित राहू शकते एवढी त्यांची क्षमता असावी. नवीन तंत्रज्ञान, जसे आर्टिफिशियल इंटेलिजंसचा वापर करून आरोग्य व्यवस्था अजून सक्षम करता येईल.
खरे सीमोल्लंघन...
काही दिवसांत देवेंद्र फडणवीस कोरोनारूपी राक्षसाला हरवून सुदृढ़ घरी परततील. एका प्रकारे त्यांचे सीमोल्लंघन होईल. राज्यात, राजकिय आणि कोरोना सीमोल्लंघन कधी होते ते बघूया. त्यासाठी कुणाला साकडे घालावे लागेल, कुणाला रौद्र रूप धारण करावे लागेल हे काळच ठरवेल. कविवर्य भा.रा.तांबे यांच्या "रुद्रास आवाहन" या कवितेतील काही ओळी सहज आठवल्या
"डमडमत डमरु ये, खण्खणत शूल ये,
शंख फुंकीत ये, येइ रुद्रा ।
प्रलयघनभैरवा, करित कर्कश रवा
क्रूर विक्राळ घे क्रुद्ध मुद्रा ।। ध्रु०।।
पाड सिंहासनें दुष्ट हीं पालथीं,
ओढ हत्तीवरुनि मत्त नृप खालती,
मुकुट रंकास दे करटि भूपाप्रती,
झाड खट्खट् तुझें खड्ग क्षुद्रां ।। २ ।।"
बघूया" रुद्र" कुणाच्या रूपाने, रूप धारण करून येतात ते.
कालाय तस्मै नमः. रुद्रार्पणमस्तु ||
- धनंजय मधुकर देशमुख, मुंबई
(लेखक एक स्वतंत्र मार्केट रिसर्च विश्लेषक आहे. वरील पोस्टसाठी लागणारी माहिती (फोटो, आकड़े, कविता) इंटरटनेट वरुन साभार गोळा करण्यात आली .)
Comments
Post a Comment