12 नोव्हेंबर 20, मुंबई
आहे तेच, तरीही...
बर्याच लोकांनी कधीतरी टॉम क्रूस याचे मिशन इम्पॉसिबल (MI) नावाचे सिनेमे बघितले असतील. 1996 मध्ये सुरू झालेली आणि आज पर्यंत सहा सिनेमे असलेली ही सिरीज दर दोन-तीन वर्षात एक नवीन सिनेमा घेऊन येते. पुढच्या दोन वर्षांत MI-7 आणि MI-8 येतील.
आज पर्यंत आलेले MI सिरीजचे सहा सिनेमे, USD 828 मिलियन म्हणजे जवळपास सहा हजार कोटी रुपये (आजच्या चलनदरात मोजले तर) खर्च करून बनविले आहे. त्यांची जागतिक कमाई सुद्धा तेवढीच घसघशीत आहे, USD 3.57 बिलियन म्हणजे जवळपास 26-27,000 कोटी रुपये!!
काय आहे MI चे वैशिष्टय़?
तसे बघायला गेले तर विशेष असे काहीच नाही. प्रत्येक MI सिनेमाची जडणघडण सारखीच असते. बहुतांश वेळी कथानक रशिया किंवा पूर्व यूरोप मध्ये असतो, आतंकवादी किंवा शस्त्रांचे तस्कर यांना काबू करण्यासाठी IMF नावाची संस्था त्यांच्या तरबेज एजेंट ईथान हंट (टॉम क्रूस) ला तीन चार सहकारी देऊन एक मोहीम आखून देते.
प्रत्येक सिनेमात एकदा तरी डुप्लिकेट चेहरा लावून समोरच्याला फसविले जाते, टॉम क्रूस शंभरच्या स्पिड ने कुठेही धावतो, हेलिकॉप्टरचा पाठलाग, हेलिकॉप्टर पडणे, बोटीत प्रवास, हंटच्या टीम मध्ये किंवा वरिष्ठांपैकी कुणी डबल एजेंट (दोन्ही कडून खेळणे) असणे, आणि शेवटी मिशन यशस्वी. यांचा क्रम पुढेमागे होऊ शकतो, पण MI सिरीजचे हे महत्वाचे घटक आहेत, आणि ते राहणारच. याला साथ देतात ते भन्नाट MI ट्यून (ट्यून तीच पण प्रत्येकवेळी इंस्ट्रूमेंट मध्ये बदल), नवनवीन इलेक्ट्रॉनिक गैजेट्स आणि भरधाव धावणार्या गाड्या आणि बाइकस.1996 मध्ये वायरलेस यंत्रणा लोकप्रिय आणि अमलात आलेल्या नसताना सुद्धा त्याचा भरपूर वापर करणार्यांपैकी एक इथान हंट आणि त्याचा चमू असावा. काळाच्या पुढे, नेहमी!!
नया नहीं है वह फिर भी...
फारसे काहीच नावीन्य नसले तरीही प्रत्येक वेळेसचा MI थोडेफार रोमांचक कथानक, प्रेक्षणीय स्थळे, अफलातून स्टंट्स नवनवीन पद्धतीने मांडून 2 तास खिळवून ठेवण्याची किमया साध्य करतो. म्हणजे
असलेल्या साहित्यात
जे बनवता
येईल ते चांगल्या पद्धतीने बनविणे
आणि सादर
करायला जमणे,
जेणेकरून गल्ला
भरभरून वाहतो.
आमची चवच न्यारी..
दरवर्षी दिवाळी आली की दिवाळीचा फराळ घरोघरी केला जातो. जिन्नस बहुतांश ठरलेले असतात - चकल्या, शेव, चिवडा, अनारसे, लाडू, शंकर पाळे आणि करंजी. काही घरांत सगळे बनवतात किंवा काही ठराविक बनवितात. पण थोडक्यात, दर वर्षी, जिन्नस तेच असले तरीही त्याची आतुरतेने वाट पाहिली जाते, आणि त्यांचा फडशा पाडला जातो. MI सारखे, फराळ करण्याची साधने हायटेक नसली तरीही त्यात प्रगती आहे. कधी-कधी एखादा जिन्नस थोड्या फार प्रमाणात फसतो, डबल एजेंट सारखं, पण तरीही त्याचा योग्य तो वापर होतोच, त्याला योग्य ती वागणूक दिली जाते.
ऑफलाइन ते ऑनलाईन...
फराळ बनविण्यासाठी पारंपरिक पद्धती वापरली जात असली तरीही, फराळाच्या जिन्नसांची विक्री नवनवीन पद्धतीने होते आहे. व्हॉटसप ग्रुप, टेलीग्राम, वेबसाइट, माइक्रो साइट इत्यादिचा वापर "चविष्ट फराळ तयार आहे. घरपोच पाठविला जाईल, ऑनलाईन पेमेंटची व्यवस्था आहे " हा महत्वाचा संदेश ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अत्यंत चोखंदळ पणे केला जातोय.
वोकल फॉर लोकल..
आत्मनिर्भर भारत अभियानाला चालना देण्यासाठी प्रधानमंत्री मोदी यांनी नागरिकांना "वोकल फॉर लोकल (स्थानिक/ भारतीय वस्तूंसाठी आग्रही)" हा संदेश आत्मसात करून त्याचे अनुसरण करण्याचे आव्हान केले.
नया ये है...
विलायती चॉकलेटी पेक्षा घरगुती फराळ, चिनी बनावटीच्या माळ किंवा आकाश दिव्यां एवजी बांबू निर्मित आकाश कंदिल, गोमय (गाईच्या शेणाचे) निर्मित दिवे आणि इतर बर्याच वस्तू ऑनलाईन, माफक दरात घरपोच डिलीवरीद्वारे ऑनलाईन (वेबसाइट / ऍप/ व्हॉटसप ) उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ https://theswadeshbazzar.com
येथे अनेक लघु आणि मध्यम उद्योग आपले प्रॉडक्टस विक्रीसाठी उपलब्ध करून देतात. लघु आणि मध्यमउद्योग देशाच्या आर्थिकव्यवस्थेचा कणा आहेत, तेव्हा यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे, गरजेचे आहे. केलेच पाहिजे. (छोटा पॅकेट बड़ा धमाका).
तिखट असले तरीही गोड..
दिवाळी म्हंटले की तिखट आणि चटपटीत खाणे आलेच. राज्यात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. काहींच्या मते, येणार्या काही महिन्यात राज्यात सत्तांतर अटळ आहे. त्याची पहिली पायरी लवकरच घातली जाईल. अर्थात काहींना सत्तेचा अमरपट्टा असतो आणि आपल्यालाच तो मिळाला आहे असे वाटणे साहजिक आहे (एक वर्षापूर्वी हेच सत्तेचा अमरपट्टा नसतो हे सांगत होते).
दिवाळीच्या फराळासाठी एकमेकांच्या घरी जायची प्रथा आहे. यावर्षी त्याला मुरड घालावी लागेल, कदाचित ते योग्यच असेल. तरीही, काही राजकिय मंडळींनी फराळाचे औचित्य साधून मैत्री जुळविण्याची कामगिरी फत्ते केली तर त्यात आश्चर्य ते काय!
फराळ काढतो वाट??
2014 च्या दिवाळीत देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे वरीष्ठ सहकारी नितीन गडकरी यांनी एकत्र फराळाचा आस्वाद घेतला अश्या बातम्या आल्या होत्या. त्याच्या दोन चार दिवसांत फडणवीस यांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणुन शपथ विधी झाला.
2019 च्या दिवाळीत सुद्धा दिवाळीफराळाचे आस्वाद सेना आणि भाजप नेते सोबत घेतील असे अपेक्षित होते. मात्र तसे झाल्याचे माहिती नाही. म्हणायला देवेंद्र फडणवीस यांची दिवाळी निमित्त पत्रकार परिषद, 30/31 ऑक्टोबरला झाली होती आणि त्यानंतरच तिखट पदार्थाची रेलचेल सुरू झाली असे काहींचे म्हणणे आहे. खरेतर मिठाचा खडा 24 ऑक्टोबरलाच पडला होता जेव्हा "आम्हाला सगळे पर्याय खुले आहे" असे वक्तव्य शिवसेनेकडून आले होते. असो..
राजकिय फटाकेबाजी..
दिवाळीत फटाके उडवले पाहिजे किंवा नाही यावर गेल्या आठ दहा वर्षांपासून चर्चा सुरू झाली. कधी आवाजाचा त्रास होतो, तर कधी प्रदूषण होतो याकरिता तर आता त्याच्यामुळे कोरोना वाढेल या कारणाने फटाके फोडण्यावर बंदी घालण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे या वेळेला कदाचित दिवाळी कमी आवाजाची होईल, परंतु देशभरात राजकीय फटाकेबाजी जोरदार सुरू आहे, राहणार आहे, कदाचित वाढेल सुद्धा.
बिहारमध्ये एनडीएला बहुमत मिळाले आहे, परंतु त्यांना कमीतकमी अजून 20 आमदारांची तजवीज करून ठेवावी लागणार आहे, तरच त्यांचे सरकार सुदृढ राहील.
मध्यप्रदेश आणि गुजरात मध्ये झालेल्या पोटनिवडणुकी मध्ये भाजपला निर्विवाद यश मिळाले - तेथील सरकार अजून स्थिर झाले, अधिक जोरकसपणे काम करतील.
या यशामुळे भाजप मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असेलच. विशेष करून देवेंद्र फडणवीस यांच्या सहभागाने भाजपला बिहारमध्ये मिळालेले यश पक्षाला आणि फडणवीस यांस व्यक्तिगत अधिक आत्मविश्वास देऊन जाईल. मध्यप्रदेश मधील 27 जागांपैकी 19 जागा काढून "इनकमिंग झालेल्या नेत्यांना" भाजप व्यवस्थित पुनर्वसित करते असा संदेश महाराष्ट्रातील राजकारण्यांना गेला तर त्यात वावगे नसावे. पक्षाचा हा विजय बघून राज्यातील स्थानिक भाजप नेते किती सक्रिय होतात हे बघणे महत्वाचे.
दीपोत्सव प्रकाशपर्वाचा...
आज वसूबारस. आजपासून दिवाळसणाला सुरुवात होते. दीवा लावुन तिमीरा (दुःख, अज्ञान, अंधकार) पासून तेजाकडे (ज्ञान, मोक्ष, सुख, आनंद) नेण्याचा पर्व , दीपोत्सव सुरू होतो.
"दिवा पाहुनी लक्ष्मी येते, करुं तिची प्रार्थना, शुंभ करोती कल्याणम्.
जेथे ज्योती
तेथे लक्ष्मी,
उभी जगाच्या
सेवाधर्मी
दिशा दिशांतुनि
या लक्ष्मीच्या दिसतई पाऊलखुणा.
या ज्योतीने
सरे आपदा,
आरोग्यासह मिळे
संपदा
शत्रुबुद्धिचा विनाश
होता, सौख्य
मिळे जीवना."
दीपोत्सवाच्या आणि लक्ष्मीपूजेच्या आपणांस हार्दिक शुभेच्छा. शुभ दिपावली.
- धनंजय मधुकर देशमुख, मुंबई
(लेखक एक स्वतंत्र मार्केट रिसर्च विश्लेषक आहे. वरील पोस्टसाठी लागणारी माहिती (फोटो, आकड़े, कविता) इंटरटनेट वरुन साभार गोळा करण्यात आली .)
Comments
Post a Comment