26 मे 20, मुंबई
परीक्षांची परीक्षा..
कोरोना महामारी मुळे राज्यात लॉक डाऊन सुरू आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. बर्याच शहरांमध्ये निमलष्करी दल दाखिल झाले आहेत.
25 मार्च मध्ये पहिला लॉकडाऊन जाहीर झाला त्यात राज्यातील सगळी शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली होती. काहींना त्यावेळी अपेक्षित होते की कदाचित एप्रिल - मे मध्ये परिस्थितीत सुधार होईल. ते स्वाभाविक होते.
परंतु, तसे घडले नाही. राज्यात आज आकडा पन्नास हजारावर पोहोचला आहे. त्यामुळे एकीकडे चिंतेची बाब आहे, परंतु दुसरीकडे एक मोठा प्रश्न निर्माण झाला तो महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा.
विशेषकरून, इंजीनियरिंगच्या विद्यार्थ्यांपुढे मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. मार्च पर्यंत कॉलेजेस सुरू असल्यामुळे, बहुतांश कॉलेजात 60-70% अभ्यासक्रम पूर्ण झाला होता.
UGC च्या निर्देशना प्रमाणे राज्यातील शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा 1 ते 10 जुलै दरम्यान घ्यावयाच्या आहेत. उदाहरणार्थ, जी मुले इंजीनियरिंग च्या शेवटच्या वर्षाला आहेत, त्यांची आठव्या सेमिस्टरची परीक्षा वरील तारखांना होण्याची शक्यता आहे.
ती कशी घेतली जाईल (ऑनलाईन की ऑफलाइन) याबद्दल फारशी माहिती नाही.
ज्या विद्यार्थ्यांचे सातव्या सेमिस्टरमधील काही विषय बाकी आहेत त्यांच्या बद्दल स्पष्टता नाही.
थोडक्यात, इंजीनियरिंगचे जे विद्यार्थी प्रथम ते तृतीय वर्गात आहेत त्यांच्या परीक्षा होणार नाही. त्यांना मागच्या सेमिस्टर मधील गुण आणि इंटर्नल चाचणी मधील गुण मिळून जी सरासरी असेल त्या सरासरीने शेवटच्या परीक्षेत उत्तीर्ण केले जाईल.
परीक्षा घेण्यात यावी की नाही. आणि कशी घेण्यात यावी - ऑफलाइन की ऑनलाइन यावर मतभिन्नता आहे. काही मुलांनी कोर्टाकडून मार्गदर्शन मागितले आहे. ऑफलाइन परीक्षा ना घेण्याच्या मागे अनेक तर्क आहेत. काही व्यावहारिक पण आहेत. बहुतांश मुले आपल्या गावी परतली आहेत. तेव्हा ते पुन्हा कधी आणि कसे शहरांत जातील. तिथेही सोशल डिसटनसिंग कसे साध्य होईल यावर शंका आहे.
काहींचे म्हणणे आहे की ऑनलाईन परीक्षा देणे सगळ्यां विद्यार्थ्यांना जमेलच असे नाही. कारण काही मुले लॅपटॉप शहरात सोडून आली तर काही ठिकाणी, विशेषतः गावाकडे टेलीफोन नेटवर्कचा विषय आहे. ही मुले जर शहरात आली तर तसे किती सेंटर आहेत असा मुद्दा मांडला जातो.
महाराष्ट्रातील जवळपास 850 इंजीनियरिंग आणि आर्किटेक्चर कॉलेजेस मध्ये जवळपास दीड लाख नवीन जागा दर वर्षी काढल्या जातात. यातील 60-65% जागा दरवर्षी भरतात असा अंदाज आहे. म्हणजे, आपण जर चारही वर्षांच्या विद्यार्थ्यांचा विचार केला तर, आजघडीला जवळपास 4 लाख विद्यार्थी महाराष्ट्रातील इंजीनियरिंग कॉलेजेस मध्ये शिक्षण घेत असावेत.
यातील, जवळपास 20-22% विद्यार्थी ATKT (Allowed To Keep Terms) मध्ये जरी धरले तरी हा आकडा एक लाखापर्यंत जाऊ शकतो. यातील काही विद्यार्थी शेवटच्या वर्षाचे पण असू शकतात. ATKT असलेल्या विद्यार्थ्यांविषयी काय धोरण राहणार आहे ?
त्यामुळे यावर उपाय म्हणजे परीक्षा ना घेणे असा मार्ग पत्करलेला दिसतो.
परंतु, शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांसाठी हा मार्ग काटेरी ठरू शकतो. पुढे मागे ते जेव्हा पुढील शिक्षणासाठी जातील किंवा नोकरीसाठी इंटरव्ह्यूला जातील तेव्हा त्यांना या प्रश्नांचा सामना करावा लागु शकतो. त्याचा stigma होऊ नये.
भविष्यात, नोकरी देणार्या कंपनीकडे जर दोन उमेदवार असतिल, त्यातील एकाने शेवटपर्यंत परीक्षा दिली आहे आणि दुसर्याला सरासरी गुणांनी पास केले आहे, तर त्यांच्या समोर कुणाला बाद करावे हा विषय असू शकतो.
देशहितासाठी, आज घडीला जरी बहुतांश कंपन्या या मुलांना सामावून घेण्यासाठी तयार आहेत किंवा असतिल, तरीही त्यांच्या सोबत भविष्यात असे होणार नाही याची शाश्वती कोण देऊ शकेल का?
एका विशिष्ट बाजूने विचार केला तर, या बॅचच्या मुलांना नको ती विशेषणे लावली जाऊ शकतात. त्याचा stigma होते शकतो, किंवा त्यांच्या मनात शल्य राहू शकते. पुढील आयुष्यात त्याचा नको तसा प्रभाव पडू शकतो.
अर्थात, या जर तर च्या गोष्टी जरी असल्या, तरीही या विषयाचे सगळे कंगोरे सखोलपणे तपासले गेले पाहिजे. शिक्षण क्षेत्रातील, मानसिक उपचार क्षेत्रातील आणि व्यावसायिक जगतातील तज्ञ असलेली एक समिती, या बाबींचा सर्व बाजूंनी सांगोपांग अभ्यास करू शकते. अशी एक समिती नेमून त्यांच्या शिफारसींवर चर्चा करून सर्व संमतीने निर्णय घेतला तर ते जास्त योग्य ठरेल.
खरे तर, मार्च पासून तर मे मध्यापर्यंत अश्या बाबींसाठी भरपूर वेळ होता. असो.
परीक्षा ना घेणे हा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी घेतलेला निर्णय आहे असे कुणी म्हंटले तरी तोच एक उपाय आहे असे अधोरेखित करण्यापेक्षा, तो कसा विचारपूर्वक निर्णय आहे हे बिंबवण्याची गरज आहे.
त्या वेळचे अधिकारी आपली जबाबदारी झटकून मोकळे झाले असे हे विद्यार्थी म्हणणार नाही याची खबरदारी घेऊन, त्यावर जबाबदारीने निर्णय घ्यावा. राजकिय किंवा इतर कोणत्याही दडपणाखाली ना येता निरपेक्षपणे निर्णय घेतला जावा.
या विद्यार्थ्यांच्या पालकांवर सुद्धा प्रचंड दडपण असावे. आपल्या उरामध्ये त्यांनी एक उमेद ठेवली असेल, की एक दिवशी आपले पाल्य चांगल्या गुणांनी शेवटची परीक्षा उत्तीर्ण करून चांगल्या ठिकाणी नोकरीला लागेल त्यांचा सुद्धा भ्रम निरास होऊ शकतो.
आजचा विद्यार्थी उद्याचा देश घडवितो असे म्हणतात. त्यांच्या भविष्याशी खेळून आपण देशहिताला टाच देतो आहे का? हे नीट समजूनच निर्णय घेतला गेला तर त्याचे स्वागतच होईल.
कालाय तस्मै नमः!
धनंजय मधुकर देशमुख, मुंबई
dhan1011@gmail.com
Comments
Post a Comment