१६ जून २०२० मुंबई
तू चाल पुढं, तुला र गड्या भीती कशाची
3 जून
ला कोकण किनारपट्टीवर "निसर्ग" नावाचे चक्रीवादळ आदळले. सुमारे 100-120
किमीच्या वेगाने वारा, पाऊस आणि ढग यांचे मिश्रण असलेले हे चक्रीवादळ
रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात थैमान घालून पुढे गेले. अन्य जिल्ह्यात सुद्धा
नुकसान झाले.

सुपारी/पोफळी, नारळ, काजू, आंबा, कोकम इत्यादी, लागवडीच्या बागा/वाड्या जमीन दोस्त झाल्यात. जी झाडे सध्या
उभी आहेत ती चांगली आहेत का, किंवा किती दिवस उभी राहतील याची काही शाश्वती
नाही. बर्याच ठिकाणी मोठी झाडे आंबे, फणस सुद्धा उन्मळून पडली.
एक
झाड कापून न्यायचे, दोन हजार. छोट्या वाडय़ांमध्ये सरासरी पन्नास ते साठ
झाडे असतात. म्हणजे एक दीड लाख रुपये खर्च फक्त झाडे तोडून, जागा साफ करून
घेण्यासाठी. बर्याच ठिकाणी अजून नियमित वीज पुरवठा नाही. एरवी चारशे पाचशे
रुपयांचा पत्रा आठशे नऊशे ला विकला जातोय. लावायला लागणारी माणसे कमी,
कामे जास्त. कौलारू घरासाठी लागणारे कौलं सुद्धा अव्वाच्या-सव्वा भावात
विकले जात आहेत. त्यात आता पुन्हा, समोर मॉन्सून उभा ठाकलेला. म्हणजे पुढच्या तीन चार महिन्यांत फार कामे होतील की नाही याची शंकाच आहे.
तिहेरी संकट!!
आधीच
वैश्विक कोरोना महामारी चे संकट. त्यापासून स्वतः ला आणि परिवाराला दूर
राखण्याची तारेवरची कसरत. लॉकडाऊन मुळे होत असलेले आर्थिक नुकसान. आणि आता
"निसर्ग" चक्रीवादळामुळे घरांचे, आणि फळबागांचे झालेले अतोनात नुकसान.
या संकटांना
कोकणातील नागरिक खंबीरपणे सामोरे जातील यात शंका नाही. परंतु तसे होतांना
त्यांना बर्याच समस्यांचे निवारण करावे लागणार आहे, त्यासाठी प्रशासनाचे,
सामाजिक संस्थांचे, राजकिय पक्षांचे आणि राज्यातील नागरिकांचे आर्थिक,
सामाजिक, कृषि विषयक तंत्रज्ञान आणि वैद्यकीय सहकार्य अपेक्षित आहे.
टिकाऊ सहकार्य..
हे सहकार्य फक्त दोन चार महिन्यांसाठी ना
मर्यादित ना राहता, पुढच्या 5-10 वर्षे ते कसे टिकून राहील याचा विचार करणे
महत्वाचे आहे. त्याचा शाश्वत फायदा होईल हे बघणे गरजेचे आहे.गरजेच्या
आणि मदतीच्या प्राथमिकता ठरवाव्या लागतील - तात्काळ, मध्यमकाळ आणि दीर्घकाळ. याचा वापर
करून मदतीचा पॅकेज बनवला तर ते जास्त उपयोगी ठरेल, चांगले दूरगामी परिणाम
मिळतील.
हवा आहे मदतीचा हात..
आर्थिक मदत..
ज्यांच्या घरांचे नुकसान झाले त्यांच्या घरांची ताबडतोब दुरुस्ती करणे.
त्यासाठी लागणारी सगळी साधन सामग्री (शिधा पासून तर पत्रा / कौलं, केरोसिन,
औषधि) पुरविणे.
ज्यांच्या
फळबागा उध्वस्त झाल्या आहेत, त्यांना झाडे काढण्यासाठी आणि सफाई
करण्यासाठी मनुष्यबळ, उपकरणांसाठी मदतीचा हातभार लागणार आहे. फळबागा
तयार व्हायला 5 ते 10 वर्षांचा कालावधी लागतो. याकाळात त्यांच्या कडे लक्ष
द्यावे लागते, मेहनत लागते. ज्यांच्या फळ बागा उध्वस्त झाल्या आहेत,
त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत काही वर्षे रखडले जाणार आहे. कदाचित काही
उत्पन्न मिळणार नाही.आता ते जी नवीन लागवड करतील त्यासाठी लागणारी रोपटी विकत घ्यावी लागतील.जोपर्यंत हे रोपटे फळ देणारे वृक्ष होत नाही तोपर्यंत त्यांना कमाईचे वैकल्पिक स्त्रोत शोधावे लागतील. कदाचित कर्ज घ्यावी लागतील.
मासेमारी
करणार्या मच्छिमार बांधवांच्या बोटी तुटल्या असतिल, हरवल्या असतिल. बोट
ही त्यांच्या कमाई चे मुख्य साधन आहे, तिच्याशी त्यांचे भावनिक आणि आर्थिक
नाते असते. मॉन्सून असल्यामुळे पुढील काही महिने ते समुद्रात जाणार नाहीत,
तेव्हा या मधल्या काळात त्यांच्या बोटी दुरुस्त करून देणे किंवा नवीन बोटी
उपलब्ध करून देणे हे महत्वाचे ठरेल.
कोकणातील
शाडूच्या गणपतीमूर्ती जगप्रसिद्ध आहेत. तेथे अनेक कारखाने आहेत, काही तर
पिढीजात आहेत. चक्रीवादळामुळे त्यांचे सुद्धा नुकसान झाले असेल.
या
सगळ्यासाठी भरपुर आर्थिक मदत लागेल. येत्या काळात राज्य आणि केंद्र सरकार
काही पॅकेज घोषित करेलही, पण तो पॅकेज किती सर्वसमावेशी आहे हे बघणे
औत्सुक्याचे ठरेल.
सामाजिक मदत..
तिहेरी संकटात सापडल्यामुळे इथल्या नागरिकांच्या मानसिक स्थितीवर परिणाम
होऊ शकतो. त्यासाठी सामाजिक संस्थानी पुढे येऊन त्यांचे समुपदेशन
(counseling) करावे. हे समुपदेशन सामाजिक कार्यकर्ते किंवा मानसशास्त्राचे
विद्यार्थी किंवा डॉक्टर करू शकतात.
माध्यमांची भूमिका
गेल्या वर्षी कोल्हापूर भागात महापूर आला होता. अनेक दिवस पाणी साचले होते. रस्ते तुटले होते, त्यामुळे गावांचा संपर्क तुटला होता. तरीही माध्यमांतून या महापुराने केलेल्या नुकसानीचा लेखाजोखा कळत होता.
"निसर्ग" चक्रीवादळ 4 जून पर्यंत सक्रिय होते. दोन दिवस माध्यमांमध्ये याबद्दल प्रचंड प्रमाणात कवरेज झाले. त्यानंतर सुद्धा, वादळामुळे झालेल्या नुकसानीची भीषणता माध्यमांना दाखविता आली असती. परंतु तसे दिसले नाही.
आज जवळपास दोन आठवडे होतील, परंतु, सुरूवातीची थोडीफार मदत (100 कोटी) सोडली तर, अशी मोठी शासकीय मदत किंवा पॅकेज जाहीर झाल्याची बातमी नाही. किंवा माध्यमांत त्याबद्दल फारशी उत्सुकता / आग्रह (आक्रोश तर फार लांब) बघायला मिळत नाही. माध्यमांत कोकणातील लोक कोल्हापूरच्या तुलनेत कमी असावेत कदाचित?
काही नवीन विचार व्हायला हवा..
कोकणात दापोली येथे जग प्रसिद्ध कृषि विद्यापीठ आहे त्यामुळे येथे माहिती मुबलक आहे. अनेकांच्या
फळबागा उध्वस्त झाल्या आहेत. ज्यांच्या कडे साधन सामुग्री आहे ते लवकरच
नवीन लागवड करतीलही. परंतु, यावेळेस काही नवीन विचार करायला हरकत नाही.
जल संवर्धन (Rain Water Harvesting)
कोकणातील
बहुतांश भाग दुर्गम आहे. येथील असामान भूभागाचा सर्जनशील (creatively)
वापर करून मोठ्या प्रमाणात इथे जल संवर्धन होऊ शकते, त्याचा वापर इथेच
किंवा दुसरीकडे होऊ शकतो.
हाइड्रोपोनिक्स (Hydroponics)
हाइड्रोपोनिक्स पद्धतीने कमी जागेत, मातीचा कमी किंवा कुठलाही वापर न करता भाज्या किंवा वनस्पतींची लागवड केली जाऊ शकते.
औषधी वनस्पतींची लागवड
बर्यापैकी कमी काळात उत्पन्न देणार्या औषधि वनस्पती, पंचगव्य सारख्या गोष्टींचा विचार व्हायला हवा.
तीन
ते नऊ महिन्यात यातील अनेक वनस्पती उत्पन्नाचे स्त्रोत उभे करू शकतात.
लागवडीचा कमी खर्च, माफक देखभाल ही या वनस्पतींची विशिष्टता आहे. आणि या
वनस्पती मुळे जमिनीची गुणवत्ता सुद्धा सुधारते (उदाहरणार्थ, तुळशीच्या
मंजिरी खतासारखे काम करते).
कुठल्या औषधि वनस्पतींची लागवड होऊ शकते?
हळद,
कोरफड, ब्राम्ही, कृष्ण तुळस, गुळवेल, पिंपळी, मिरे, जटामांसी, अडुळसा,
आले, आवळा, पुनर्नवा, अश्वगंधा, तमाल पाने आणि निर्गुडी.
पंचगव्य
पंच’ म्हणजे पाच आणि ‘गव्य’ म्हणजे गायी पासून ( देशीगायीपासून ) उत्पन्न होणारे पदार्थ.ह्यावरून गोमूत्र, गोमय (शेण), गोरस (दूध), गोदधी (दही), गोघृत (तूप) ह्या पदार्थांच्या मिश्रणापासून तयार होते ते ‘पंचगव्य’होय. कोणत्याही धार्मिक कार्यप्रसंगी शरीर शुध्दिहोण्यासाठी
प्रथम पंचगव्याचे प्राशन करावयाचे असते. ह्याखेरीज, देवप्रतिमेचे व माळेचे
पवित्रीकरण करताना प्रथम त्यांच्यावर पंचगव्य प्रोक्षण करतात. थोडक्यात,
धर्मशात्रदृष्ट्या शुध्दि (शुचिता) प्राप्त होण्यासाठी पंचगव्याचे प्राशन किंवा प्रोक्षण करतात. पंचगव्यव हा मंत्र म्हणून प्राशन केल्याने सर्व दोष जातात.
भारतीयांना
अनादिकालापासून गाईचे महात्म्य विदीत आहेच. पण अगदी अलीकडेच जर्मनी,
अमेरिका, रशिया इत्यादी अतिप्रगत देशांतही गायीपासून ( विशेषत: भारतीय
गायीपासून) मिळणार्या मुत्र, शेण, दूध, दही व तूप
इत्यादी पदार्थांवर प्रयोग शाळेत शास्त्रशुध्द संशोधन होऊन त्यांचे अनन्य
साधारण महत्व सिध्द झालेले आहे.
निरोगी देशीगायीच्या दुधात कोणतेही दोष नसल्यामुळे
त्या दुधा पासून तयार होणारे दही व तूप हे पदार्थही शुध्द, पाचक,
कृमीनाशक, बलवर्धक, बुध्दीवर्धक, उत्साहवर्धक असतात. गोमयापासून तयार
झालेल्या शेण्यांचे (गोवर्यांचे) ज्वलन होताना
त्यातून निघणार्या धुरातील वायूच्या विविध चाचण्या, चिकित्सा व प्रयोग
झालेले असून त्या धूरापासून कोणत्याही प्रकारचे अनिष्ट प्रदूषण होत नाही;
किंबहुना तो धूर पर्यावरणास उपकारकच असतो असे सिध्द झाले आहे. गोमूत्रातील
मूलद्रव्यांची रासायनिक चाचणी होऊन ती द्रव्ये रोगरोधक, रोगप्रतिकारक,
जंतुनाशक व कुजण्याची क्रिया थांबवणारी असतात असेही सिध्द झाले आहे. औषधि, अर्क, काढे, गौर्या, कीटकनाशक आणि गोबर गैस इत्यादि अनेक उत्पादने घेता येतील.
सौर ऊर्जा
कोकणात बहुतांश दुर्गम भाग आहेत. वीज पुरवठा अनेकदा बंद पडतो. याला उपाय म्हणजे सौर
ऊर्जा. पंप, सेंसर वर चालणारी सिंचन पद्धती आणि इतर कृषी उपकरणे इत्यादी
अनेक गोष्टी सौर ऊर्जेवर सहज चालतात. असतीलही. गरज आहे याचा वापर
वाढविण्याचा. या क्षेत्रासाठी केन्द्र आणि राज्यसरकारच्या अनेक योजना आहेत,
खासगी क्षेत्रातील अनेक कंपन्या सुद्धा यासाठी मदत/ भांडवल पुरवितात.
"हनी मिशन"
नवीन
वनस्पती लावताना मधमाश्यांची जोपासना करता येईल अशी व्यवस्था करायला हवी.
केंद्र सरकारच्या खादी आणि ग्रामोद्योगविकास मंडळातर्गत "हनी मिशन" राबविले
जाते. विशेष म्हणजे म्हणजे ही व्यवस्था लघु उद्योजकांसाठी आहे. मधमाशी
राहण्यासाठी खादी विकास ग्रामोद्योग महामंडळ ने विशेष प्रकारचा "बी बॉक्स"
तयार केला आहे. हा बॉक्स अत्यंत माफक दरात दिला जातो. सोबत लागणारे
प्रशिक्षण (याला काही शिक्षण लागत नाही, कुणीही लगेच शिकू शकतो) सुद्धा
दिले जाते. मधमाश्यांचे पालन करून, शहद, मेण आणि द्रव्य खाजगी कंपन्या (औषधि
किंवा खायचे उत्पादने) सहजपणे विकत घेतात.
पर्यटन
कोकणात
पर्यटनाला विशेष स्थान आहे. पर्यटकांना अपेक्षित असलेले आणि त्यांना
मिळणारे अनुभव यात बर्याचदा तफावत असते. कोकणातला पर्यटन व्यवसाय अजूनही
असंघटित आहे. आज गरज आहे ती या क्षेत्राला संघटीत करून, एकसंध धोरण
राबवण्याची (रचना, भाडे आणि ग्राहकाचा अनुभव (setup, pricing and customer
experience)). कोरोना, आणि नंतर लागलेल्या लॉकडाऊनमुळे निर्माण झालेली भीती
एकदा कमी झाली किंवा निवळली की पर्यटक हळू हळू इकडे येतील. येणार्या
काळात घरगुती पर्यटनाला (Domestic tourism) चालना येण्याची चांगली शक्यता
आहे. तेव्हा इथल्या व्यावसायिकांनी एकत्र येऊन, कोकणासाठी सामायिक धोरण
बनविणे गरजेचे आहे. पर्यटकाला नवीन अनुभव (जसे कृषी पर्यटन, आरोग्य पर्यटन
(आयुर्वेदिक उपचार), आणि समुद्राचा अनुभव (Ocean Biodiversity)) , देणे
गरजेचे आहे. गरज पडली तर शासन किंवा खाजगी क्षेत्रातून भांडवल आणि सुविधा
उपलब्ध करून घ्याव्या.
पायाभूत सुविधा
असे
म्हणतात एकदा, एका मोठ्या राष्ट्राचेअध्यक्ष मॉरिशस ला आले होते.
मॉरिशसच्या नेत्यांनी त्यांना त्यांचे राष्ट्र सुद्धा कशी प्रगती करेल असे
विचारले असताना, ते म्हणाले "तुम्हाला काहीच विशेष असे करायची गरज नाही.
तुम्हाला निसर्गाने भरभरून दिले आहे. फक्त इथले रस्ते सुधारा. पायाभूत
सुविधा नीट बसवा". कोकणात सुद्धा पायाभूत सुविधांची गरज आहे. रेल्वे, रस्ते, विमानतळ इत्यादी पायाभूत सुविधांचा तात्काळ विकास होणे गरजेचे आहे.
मनुष्यबळ महत्वाचे
उपरोक्त सगळ्या बाबी पूर्ण करण्यासाठी मनुष्य बळ लागेल. कधी कुशल
तर कधी अकुशल. हे मनुष्यबळ राज्यातील इतर भागातून येईल की इतर राज्यातून
येईल यावर राजकारण न करता विभागाचा पुनर्निर्माण कसा होईल हे बघणे जास्त
महत्वपूर्ण आहे.
व्यावसायिकांची गरज..
"आम्ही
येथे लागणारी सगळी व्यवस्था (backward and forward integration, cold storage, gradation, processing units) उभी करतो, तुम्ही आम्हाला मुबलक
आणि उत्तम गुणवत्तेचा कच्चामाल किंवा उत्पादने उपलब्ध करा", असे धोरण घेऊन
खाद्यउत्पादने बनविणाऱ्या किंवा विकणार्या मोठमोठ्या उद्योजकांनी कोकणात
यावयास हवे.त्यांना येऊ द्यावे.
यात मराठी आणि अमराठी
उद्योजक पण असू शकतात. उदाहरणार्थ, विको, चितळे, बियाणी, पतंजली, महिंदा
आणि महिंद्रा, ITC, रिलायन्स (यांचा जिओमार्ट लवकरच मोठ्या प्रमाणात सुरू
होणार आहे), अडाणी आणि इतर अनेक. या कंपन्या इतर राज्यांमध्ये कम्यूनिटी
फार्मिंग करायला मदत करतात.
बाजारपेठ
मुंबईमध्ये
दरवर्षी "महालक्ष्मी सरस" नावाची प्रदर्शनी भरते. दहा-बारा दिवसांसाठी
महाराष्ट्रीय बाजारपेठ सजते. यात राज्यातील जिल्हय़ातून, सगळे मिळुन जवळपास
पाचशेहून अधिक महिला बचत गट आपले पदार्थ विक्रीस आणतात. बहुतांश माल पाच
सहा दिवसांत च संपतो. लोणची, कुरडया, पापड, मसाले, धान्य आणि इतर जिन्नस
हातोहात विकले जातात. परंतु ही प्रदर्शनी वर्षातून एकदाच होते.
जर
कोकणातील उद्योजकांत एकवाक्यता झाली आणि त्यांनी मिळून एक ऑनलाईन
मार्केटप्लेस तयार केले तर? त्यांची उत्पादने फक्त मुंबईच नाही तर देशातील
भागात सुद्धा हातोहात विकले जातील, तेही वर्षभर!
"कुछ नया और अलग"
वर
नमूद केल्या प्रमाणे आपण फक्त नुकसानग्रस्त भागाचाच नाही तर संपूर्ण
कोकणाचा आर्थिक विकास करू शकतो. गरज आहे नवीन आणि मोठा विचार करण्याची. तो
इमानदारीने राबवण्याची शाश्वती देण्याची.
माजी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नुकतेच कोकणचा दौरा करून आले. त्यांच्या म्हणण्यानुसार,
"केंद्राच्या आत्मनिर्भर पॅकेजमध्ये फळबाग, मासेमारीसाठी अनेक योजना असून
त्या कोकणात तातडीने लागु करता येतील." या वक्तव्याला फार महत्व आहे कारण
आत्मनिर्भर पॅकेज मध्ये मोठ्या तरतुदी आहेत. गरज आहे ती सांगोपांग विचार,
अभ्यास करून त्यांचा वापर करण्याचा.
जे जे शक्य आहे ते केलेच पाहिजे.
आपल्या अनुभवातून म्हणा, किंवा मानसिकतेतून म्हणा, कष्टकारी किंवा शेतकरी संकटांवर मात करतातच. त्यांना साथ हवी असते ती निसर्गाची. 1937 साली आलेल्या 'कुंकू' या चित्रपटातील आहे. शांताराम आठवले यांचे हे गीत खूप छान पद्धतीने त्याचे
अनुमोदन करते.
"मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथ्वी मोलाची,
तू चाल पुढं तुला र गड्या भीती कशाची, पर्वा बी कुनाची."
कुणाचीपण
पर्वा ना करता कोकणातील आपले बंधू भगिनी लवकरच पुन्हा उभे राहतीलही, पण मग
सुराज्य ते कसले!! तेव्हा सगळ्यांनी मिळून योगदान करूया.
कालाय तस्मै नमः.
धनंजय मधुकर देशमुख, मुंबई
Khup mahitipurn lekh
ReplyDeleteधन्यवाद 🙏
Delete