दिवेलागण
"दिवे लागले रे दिवे लागले
तमाच्या तळाशी दिवे लागले
दिठींच्या दिशा खोल तेजाळताना
कुणी जागले रे कुणी जागले"
पंडित जितेंद्र अभिषेकी ह्यांचे हे भावगीत ऐकल्यावर काळाच्या पडद्याआड झालेल्या अनेक "संध्याकाळी" लहरीप्रमाणे तरळून गेल्या.. तरंगून गेल्यात. अर्थात, ह्या गीतातील मतीतार्थ खूप गहन आहे, वेगळा आहे.. तरीही.अर्धे आयुष्य अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथे गेले. ऐनशी-नव्वदीच्या काळातील अमरावती बडनेरा हे फार वेगळ होतं आणि त्या संध्याकाळी सुद्धा! त्यांचा सूर, साज काही औरच असतो..असायचा..
उन्हाळ्यातील संध्याकाळ मात्र "विस्तारित " असायची . जमेल तेवढ्या उशिरा पर्यन्त खेळून घरी आल्यावर, दूसरी इनिंग सुरू व्हायची.. मित्रांसोबत जमेल त्या विषयावर चर्चा सुरू झाली की मग ती घरचे ओरडून बोलवत नाही तोपर्यंत चालायची . विषय खूप मार्मिक असायचे - क्रिकेट सिनेमा, राजकारण वगेरे . अभ्यासाची कधी कुणी चर्चा करतो का?
दिवाळीच्या दिवसांत "दिवेलागण " ह्याला तर विशेष महत्व असायचे (अजूनही आहेच ) , फटाक्यांमुळे त्याचे महत्व अधिक "वाजायचे". तुळशी विवाह झाला की मात्र हिवाळ्यातील संध्याकाळ जरा लवकरच व्हायची, त्यामुळे घरी आल्यावर जमेल तसे बैठे खेळ चालायचे..
काळ आणि जागा दोन्ही बदलल्यात . आता बडनेरा सारख्या ठिकाणी सुद्धा अशी संध्याकाळ होत असेल का शंका आहे . असो . पण दिवेलागण ह्याचा दुसरा अर्थ रहायचा परीक्षेत किंवा स्पर्धेत काय दिवे लावले असा...
फ्यूज़ जरी जायचा नाही तरी 100 व्याट ची ट्यूब सुद्धा लागायची नाही . त्यामुळे जमेल तसे दिवे लावायचो !
राजकारणातील दिवे कधी लागतील ह्याचा नेम नाही . कधी कधी दिवसाढवळ्या नको त्या ठिकाणी हे महाभाग दिवे लावतात, किंवा तशी त्यांची ख्यातीच असते किंवा त्यांना कमवावी लागते.
क्रिकेटप्रेमी (मुळातच खेळ प्रेमी) ऑस्ट्रेलियातील चॅनल नाइन चा मालक आणि प्रसार माध्यम सम्राट कॅरी पॅकर ह्याने तर 1980 च्या दशकाच्या सुरुवातीलाच क्रिकेट मध्ये "दिवेलागण" करून एक नवीन पायंडा घातला. "डे-नाइट" क्रिकेट जन्माला घातला. जेव्हा तिकडे मॅच असते ते आपल्यासाठी ठीक होते, पण जेव्हापासून भारतात मॅचेस सुरू झाल्यात तेव्हापासुन मात्र "ओवरटाइम " होतो . आयपीएल मुळे तर आता पार कार्यक्रम बदलतात..
थोडक्यात "दिवेलागण" ची कातरवेळ अजूनही महत्वाची आणि "मनाजवळची " आहे .
लावूया एक दिवा आपल्या सैन्य बांधवांसाठी .. मनामध्ये आणि दारी सुद्धा..
Comments
Post a Comment